लातूर : प्रतिनिधी
मस्साजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची जिल्ह्यातील गुंडाना खंडणी वसुलीच्या कुकर्मात अडचण ठरु लागली म्हणून त्यांची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात अनेक दिवस आरोपी मोकाट होते. कारण त्यांना राजकीय वरदहस्त होता. परंतू हे प्रकरण लोकसभा व विधानसभेत गाजल्यानंतर व जनतेच्या तीव्र रोषानंतर आरोपीना अटक व शरणागती पत्करावी लागली होती. संतोष देशमुख कुटुंबियांना त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वैभवी देशमुखने पित्याचे क्रूर हत्येनंतर न्यायासाठी एक प्रकारे एल्गारच पुकारला आहे. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजात तिच्याबद्दल विलक्षण सहानुभूतीची लाट उसळली आहे. केज तालुक्यातील लाडेगाव येथील रहिवाशी असलेले परंतू हल्ली मुक्काम लातूर येथे रहिवास असणारे काशिनाथ अंबाड व त्यांचे कुटुंबियांनी ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मस्साजोग येथे जावून वैभवीस जिजावू ट्रॉफी देवून यथोचित सन्मान केला. व देशमुख कुटुंबीय यांचेप्रति संवेदना प्रगट करून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना नैतिक पाठिंबा दिला आहे.