छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा, अशी मागणी केली आहे. वाल्मिक कराड याची दहशत आणि पोलिस खात्यात असलेला दबाव पाहता या हत्या प्रकरणाचा खटला बीडमध्ये चालवणे योग्य ठरणार नाही.
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण तापले आहे. या घटनेशी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे राईट हँड समजले जाणारे वाल्मिक कराड यांचा संबंध जोडला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एकवीस दिवसांनी दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड पुणे येथे पोलिसांना शरण आला आहे. त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी केज न्यायालयाने सुनावली आहे.
या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड हा अनेकदा पोलिसांना आदेश द्यायचा. मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघे एकाच नाण्याच्या बाजू आहेत, असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर किंवा पुणे येथे चालवला पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे सांगितले.