बीड : प्रतिनिधी
वाल्मिक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला, अशी टीका सुरेश धस यांच्यावर केली. आता टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले होते. मात्र, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली. यानंतर विरोधकांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.
सुरेश धस त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिले आहेत. मी आजही ठाम आहे, उद्याही राहील आणि जोपर्यंत या आरोपींना फाशी होणार नाही तोपर्यंत मी ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर कुणाच्या मनाला ठेच पोहोचली असेल तर ती काढून टाका, या प्रकरणात शेवटपर्यंत लढा मी देणारच आहे, असे त्यांनी म्हटले.
राऊत यांच्यावर बोलताना धस म्हणाले, संजय राऊत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रवक्ते आहेत. त्यांच्यावर माझ्यासारख्या माणसाने बोलणे उचित ठरणार नाही, असा टोला सुरेश धस यांनी संजय राऊत यांना लगावला. एखाद्या माणसाच्या अंगात इतका वेगळेपणा असू शकतो हे पहिल्यांदा पाहायला मिळाले. क्रूर हत्या झाली, याचे यांना काही वाटले नाही. एखादे पद देतील किंवा लाभ होईल म्हणून तुम्ही भेटता हे चुकीचे आहे. या गुप्त भेटीची माहिती ज्याने बाहेर आणली त्याला मार्क दिले पाहिजेत. त्याच व्यक्तीने ख-या अर्थाने मराठा समाज जागा केला आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती. याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील जरी काही बोलले असतील तरी आता एक-दोन गोष्टी पुढे येत आहेत. त्यांचाही गैरसमज दूर होईल, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.
एक-दोन दिवसांमध्ये वादळ शांत
ते पुढे म्हणाले की, धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे नागरिक माझ्यासोबत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भूमिका माझ्यासोबतच राहील. हे पेल्यामधले वादळ आहे. एक-दोन दिवसांमध्ये शांत होऊन जाईल. आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आजही सांगितले की,
धनंजय मुंडे यांची मी घेतलेली भेट आणि बावनकुळे साहेबांकडे मी जेवणासाठी गेलो ती भेट या दोन्ही एकत्र सांगण्यात आल्या. कुणीतरी अतिशय व्यवस्थितपणे यामध्ये षडयंत्र रचले आहे. हे सगळं षडयंत्र मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा डाव रचला जातोय, असा आरोप त्यांनी केला आहे.