मुंबई : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुंबईत जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असेल. या मोर्चासाठी मुंबईच नाही तर राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. अठरापगड जातीचे लोक या मोर्चासाठी येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. परभणी, बीड, धाराशिव, पैठण, छत्रपती संभाजीनगर, वाशिमनंतर मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे.
संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली. त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. राज्यात संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्या, आरोपींना फाशी द्या अशी विनंती करण्यात आली आहे. दादागिरी चालणार नाही, न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणा करण्यात येत आहेत. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला करणारा आरोपी लागलीच पकडण्यात येतो. पण संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याला राजाश्रय मिळत असल्याचा आरोप मोर्चेक-यांनी केला आहे.
भावाचा खून होऊन दोन महिने झाले तरी आरोपींना का अटक होत नाही, असा सवाल संतोष देशमुख यांच्या बहिणीने विचारला आहे. या बहिणीचा आक्रोश सरकारला दिसत नाही का, असे त्या म्हणाल्या. वैभवी देशमुख ही इयत्ता बारावीमध्ये आहे, लहान मुलगा आहे. लहान भाऊ सलाईन लावल्यानंतर मोर्चात आला आहे. आपली तब्येत ठीक नसते, तरीही सरकार न्याय देण्यासाठी उशीर लावत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.