बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित लोकप्रतिनिधीसंदर्भात मागण्या केल्या आहेत. हे पत्र पवार यांनी आज (दि. ६) त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मस्साजोग सरपंच हत्याकांडातील सूत्रधार अद्याप मोकाट आहेत, त्यांना तातडीने अटक करावी. तसेच या घटनेवरून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे राज्यातील लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवण्याची मागणी शरद पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेमागील सूत्रधार अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते, असे देखील पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे
बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळिमा फासणा-या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमुळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यां नी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलिस संरक्षण पुरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.