बीड : प्रतिनिधी
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला आज एक महिना पूर्ण झाला. ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात थेट विधानसभेत आवाज उठवला गेल्यानंतर सीआयडीकडे तपास वर्ग करण्यात आला. तसेच एसआयटी देखील नियुक्त करण्यात आली आहे. अटकेत असणा-या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या या तपासादरम्यान आतापर्यंत जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे, वाल्मिक कराड या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून तपास सुरू आहे. पण यातील एक आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा तपास सुरूच आहे. तो वारंवार पोलिसांना गुंगारा देत असल्याचे निदर्शनास येत आहे. कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी तीन पथके नेमण्यात आलेली आहेत.
आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे, पण कृष्णा आंधळे मात्र पोलिसांच्या तीन पथकांना गुंगारा देत आहे. त्याला अटक करण्यासाठी आता सर्वच पथकं कामाला लागली असून लवकरच त्याच्या मुस्क्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील एकाही दोषीला सोडणार नाही, असे आश्वासन देशमुख कुटुंबाला दिले. राज्यभरात विविध ठिकाणी देखील या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चे निघत आहेत. उर्वरित एका आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस प्रशासनावर दबाव वाढताना दिसत आहे. एक महिना होऊनही आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.