औसा : प्रतिनिधी
तालुक्यातील बेलकुंड येथील श्री. संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी उत्कृष्ट व शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले असून कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद शेतक-यांचा संपूर्ण ऊस १५ मार्चपर्यंत तोडणी करून गाळप केला जाईल, असा ठाम विश्वास कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने व्यक्त केला आहे.
चालू गळीत हंगामात कारखान्याने आतापर्यंत १ लाख ५ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केले असून एकूण ३ लाख ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट निश्चीत करण्यात आले आहे. सध्या कारखान्याची १०.१० टक्के साखर उतारा (रिकव्हरी) नोंदवली जात असून ही बाब समाधानकारक असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. ऊस तोडणी व वाहतुकीसाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २४ हार्वेस्टर व सुमारे १४० ते १५० वाहने कार्यरत आहेत. यामाध्यमातून दररोज सरासरी २,२०० ते २,३०० मेट्रिक टन ऊस गाळप केले जात आहे. आतापर्यंत १ लाख ०३ हजार मे टन ऊसाचे गाळप दिवस पूर्ण झाले असून सुमारे ९८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने सांगितले की, १२० ते १३० दिवसांत नियोजित उद्दीष्ट पूर्ण करण्याचा मानस असून गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने व सुरळीत सुरू आहे. शेतक-यांना ऊस बिलाचे पैसे वेळेत दिले जात असून यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. यावर्षी शेतक-यांना प्रति टन ३,०११ रुपये दराने ऊस बिल देण्यात येणार असून पहिला हप्ता प्रति टन २,७५० रुपये प्रमाणे पंधरा दिवसांपर्यंत तोड झालेल्या उसाचे पैसे थेट शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कमही नियोजित वेळेत देण्यात येणार असल्याचे कारखाना व्यवस्थापनाने स्पष्ट केले. १५ मार्चपर्यंत सर्व सभासद व बिगर सभासद शेतक-यांचा ऊस तोडणी पूर्ण केली जाईल, असा पुनरुच्चारही यावेळी करण्यात आला.
सहकारमहर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील व संपूर्ण संचालक मंडळाने उत्तम नियोजन केल्यामुळे कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम व सुस्थितीत सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारखान्याची पारदर्शक भूमिका, वेळेत गाळप, ऊसदर जाहीर करून त्वरित हप्ता वितरण यामुळे शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण असून आगामी हंगामात ऊस उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

