लातूर : प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांनाही पगार मिळावा या प्रमुख मागणीसह ईतर मागण्यांसाठी लातूर विभागातील एस. टी. कर्मचारी दि. ३ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून लातूर एस. टी. डेपोची एकही बस सुटली नाही. तर बाहेग गावाहून आलेल्या मोजक्या बसेसची ये-जा सुरु होती. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
एस. टी. कर्मचा-यांच्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. कर्मचा-यांच्या संपाचा पहिलाच दिवस प्रवाशांचे हाल करणारा ठरला आहे. बहुतेक प्रवाशांना संपाबाबत माहिती नसावी. एस. टी. बंदचा फटका विद्यार्थी, कर्मचारी, रुग्ण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. एस. टी. बसेस बंद असल्यामुळे येथील मध्यवर्ती बसस्थानक व अंबाजोगाई रोडवरील २ नंबर बसस्थानकासमोर खाजगी प्रवासी वाहनांच्ची गर्दी होती. ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढते. परंतू, एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांनी संप पुकारल्याने हे आता खाजगी प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांकडे वळल्याचे दिसून येत आहे.
एस. टी. कर्मचा-यांनी बेमुदत संप पुकारला. या संपाची सुरुवात मंगळवारपासून झाली. मात्र बहुतांश प्रवाशांना एस. टी. कर्मचा-यांच्या बेमुदत संपाविषयी माहितीच नसावी. त्यामुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकात नेहमीप्रमाणे प्रवासी मोठ्या संख्येने एस. टी. बसेसची प्रतिक्षा करीत असल्याचे दिसून आले. परंतू, लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून एकही बस फलाटावर येत नाही, एकही बस सुटत नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी चौकशी केली असता त्यांना एस. टी. कर्मचा-यांचा संप सुरु झाला आणि बसेस बंद आहेत, हे कळले. तेव्हा प्रवाशांनी नाराज होत प्रवासाला दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला.