छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना मराठवाड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील नेत्यांत धुसफूस चालू आहे. नुकताच संभाजीनगरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख असलेल्या राजू शिंदे यांनी पक्षाला रामराम केलाय. ते लवकरच भाजपात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परभणी जिल्ह्यातील माजी अध्यक्षांनीही भाजपात प्रवेश केला आहे. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरचे माजी खसदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वाद आता पुन्हा उफाळून आला आहे. खैरे यांनी दानवे यांच्याबाबत थेट नाराजी व्यक्त केली आहे.
अंबादास दानवे संभाजीनगरातील कोणत्याही कार्यक्रमात मला विचारत नाहीत, अशी खदखद खैरे यांनी व्यक्त केली आहे. अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमात बोलत नाहीत. कार्यक्रमांचं नियोजन करत नाहीत. मी सुरुवातीपासूनचा शिवसेनेचा नेता आहे. मी येथे शिवसेना वाढवलेली आहे. ते आता आले आहेत. मी अगोदरपासूनच येथे आहे. मी शिवसेना मोठी केली आहे, अशी खदखद खैरे यांनी बोलून दाखवली.
तसेच, जनताही म्हणते की खैरे साहेबांनी शिवसेना टिकवून ठेवली. इतकं असताना काही धोरणं आखताना, काही करायचं असेल तर एकत्र बसून केलं पाहिजे ना. अंबादास विरोधी पक्षनेता आहे. तो ऑगस्टपर्यंत असेल. तोपर्यंत त्याला चालू द्या, अशी जाहीर नाराजीही खैरे यांनी व्यक्त केली.
त्यांना भेटतो, दर्शन घेतो
खैरे यांच्या या नाराजीवर अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत खैरे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. मी अशात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केलेले नाही. अलिकडे माझ्या घरी लग्न झालं. या लग्नात मी त्यांना घेऊन गेलो होतो. स्वत: त्यांना गाडीत फिरवलं होतं. सगळ्या व्यवस्था दाखवल्या होत्या. मी त्यांना बोलवलं होतं. बाकी पक्षाच्या कार्यक्रमात कोणाचाही मानपान नसतो. मी तर आठवडा किंवा पंधरा दिवसांत त्यांना जाऊन भेटतो. त्यांचे दर्शन करतो. यापेक्षा त्यांना आणखी काय हवे, याबाबत मला माहिती नाही, असे स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिले. दरम्यान, आता छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेतील ही धुसफूस चव्हाट्यावर आल्यानंतर आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार? खैरेंची नाराजी दूर होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.