नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संरक्षण क्षेत्रावरील अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानी तज्ज्ञांनी भारत संरक्षण क्षेत्रात अधिक मजबूत होत असून पाकिस्तानसाठी हे धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी गुलाम मुस्तफा यांनी भारताने संरक्षण क्षेत्रावर केलेल्या तरतुदीमुळे भीती व्यक्त केली आहे. नवी दिल्लीतील भाजप सरकार अखंड भारत करण्याकडे आपली वाटचाल करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताच्या या अखंड भारताच्या स्वप्नात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा भाग असणार आहे, असे मुस्तफा यांनी म्हटले आहे.
मुस्तफा यांनी सांगितले की, भारत फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपर्यंत थांबणार नाही तर समुद्र क्षेत्रात इंडोनेशिया आणि मलेशियापर्यंत जाणार आहे. भारतीय नौदलाची क्षमता मोठी आहे, त्या तुलनेत पाकिस्तानी शक्ती खूप कमी आहे. नौदल क्षेत्रात भारताची शक्ती चीनप्रमाणे झाली आहे. तसेच सातत्याने भारताच्या शक्तीत वाढ होत आहे.
भारताला दुस-या खंडावर हल्ला करायचा नसेल तर एवढ्या मोठ्या नौदलाची गरज का आहे, असा सवाल गुलाम मुस्तफा यांनी केला. यानंतर आणखी एका माजी लष्करी अधिका-याने सांगितले की, भारताचे उद्दिष्ट हिंदी महासागरावर नियंत्रण प्रस्थापित करणे आणि त्यानंतर आपल्या सैन्य आणि हवाई दलाची ताकद वाढवणे आहे. भारत आपल्या पायदळ आणि हवाईदलाची ताकद वाढवत आहे.