सातारा : प्रतिनिधी
जागतिक दर्जा, भारतीय साहित्य आणि मराठीमधील चांगले साहित्य अशा तीन पातळीवरील वाचन जाणीवपूर्वक करायला हवे. वाचनाचा परीघ वाढवणे आवश्यक आहे; जे खोलवर रुजते त्यातून आलेल्या अनुभूतीतून झालेले लिखाण वाचकांना भावते. वरवरचे लेखन फार काळ टिकत नाही, असे मार्गदर्शन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. संगीता बर्वे, बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी ‘संवाद बालकुमार वाचकांशी’ या विषयावरील संवादात्मक कार्यक्रमात केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालकुमार वाचन कट्ट्यावर राजीव तांबे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामिल होत त्यांच्याशी संवाद साधला. पावसाचे ढग काळे का, कपाटाचे की होल हॅण्डलच्या खाली का, इस्त्री त्रिकोणी का असे गंमतशीर प्रश्न विचारत गणित, विज्ञान आणि पर्यावरण या विषयांची भीती न बाळगता ते हसत-खेळत शिकण्याची झलक दाखवली.
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘पियूची वही’ या पुस्तकाचा प्रवास उलगडताना डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, पुस्तकनिर्मिती ही प्रक्रिया दीर्घकालीन असते. माझे वडील चित्रकार होते. त्यांच्यासोबत देऊळ रंगवण्याचे काम केले आहे. त्यावेळी त्यांच्याबरोबर नदीच्या पात्रातून जावे लागत होते. कविता कशी सुचते याविषयी बर्वे म्हणाल्या, आमच्याकडे येणारी दुधाची पिशवी दूधवाला जमिनीवर ठेवून जात असे. दुधाच्या मोहापोटी एक मांजर ती पिशवी फाडून टाकत असे. यावरूनच मला ‘एक मांजर गाते सुंदर, वाजवते ती व्हायोलिन…’ ही कविता सुचली. आजची मुले खूप छान छान लिहितात. रोज नवीन पाच शब्द शिकलो तरी आपली भाषा समृद्ध होते. साहित्य संमेलने हीच प्रेरणा देतात. खूप वाचन केल्यास लेखनही छान होते. आई-वडील हे माझे प्रथम प्रेरणास्थान आहेत. अनेक वर्षे मनात नोंदविलेल्या निरीक्षणातून कधी कविता तर कथा निर्माण होते.
सेल्फी पॉईंटला प्रचंड प्रतिसाद ..
या संमेलनात साहित्य, कला यांचा जागर होत असतानाच आधुनिक ट्रेंडही पहायला मिळत आहे. संमेलनाला आधुनिकतेची जोड देत ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आले आहेत. परिसंवाद, परिचर्चा, कवी कट्टा, गझल कट्टा, ग्रंथ दालन, प्रकाशन कट्टा, बालकुमार वाचक कट्टा येथे ज्याप्रमाणे सातारकरांची गर्दी जमते आहे त्याप्रमाणे सेल्फी पॉईंट्सवरही सातारकर मंडळी आवर्जून सेल्फी घेत आहेत. मराठी साहित्य संमेलनाचे पोस्ट कार्ड, मराठी बाराखडी, लेखणी, शाळेत जाणा-या लहान मुलांचे कटआउट्सने बनवलेले खास सेल्फी पॉइंट्स साहित्य प्रेमींना आकर्षित करत आहेत.या शिवाय साता-यातील जल व्यवस्थेची प्रतिकृती,थोर व्यक्तिमत्वाची पोस्टर्स, प्रवेशद्वारा जवळ केलेली सजावट देखील उपस्थितांसाठी सेल्फी पॉइंट्स ठरत आहेत.

