लातूर : प्रतिनिधी
सामाजिक प्राणी असलेल्या माणसांचे सध्याचे जीवन यांत्रिक झाले आहे. भावनाप्रदान माणुस भौतिक सुखाच्या गर्दीत हरवून गेला आहे. परिणामी एकलकोंडे पणा वाढला आहे. आपल्या भावना, आपल्या वेदना, आपले सुख-दु:ख मांडण्याचे ‘मित्र’ हक्काचे व्यासपीठ हरवले आहे. त्यामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. माणसांनी मनमोकळेपणे संवाद साधून भावनांना वाट करुन दिली तर आत्महत्येच्या जोखडातून सुटका होऊ शकते, असे मत लातूर शहरातील सुप्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. हनुमंत किनीकर यांनी व्यक्त केले. आर्थिक विवंचना, जरजर आजार, नापिकी, कर्जबाजारी, प्रेमभंग या कारणांमुळे पुर्वी आणि आताही आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याच्या असंख्य घटना घडतात. आता अलिकडच्या काळात आत्महत्येची कारणं काहींची बदलली आहेत. धनसंपदा, पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीच्या झोतात असलेली माणसं आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्या अनुषंगाने डॉ. हनुमंत किनीकर यांनी ‘एकमत’च्या व्यासपीठावरुन संवाद साधला.
डॉ. हनुमंत किनीकर म्हणाले, आपल्या देशातीलच नव्हे तर विदेशात सुद्धा ज्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वस्तूपाट निर्माण केला असे सोलापूरचे सुप्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने सर्वांनाच धक्का दिला. पुण्याला न्युरोलॉजिस्ट नव्हते त्या काळात डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापुरला न्युरोलॉजी सुरु केली. कोणतीही गोष्ट मनापासून आणि मुळापासून करण्याची सवय असलेले डॉ. शिरीष वळसंगकर खुप धाडसी व्यक्तीमत्व होते. ते आत्महत्या करतील असे कोणालाही वाटले नाही. त्यांनी आत्महत्या केली की आणखी काय?, हे पोलीस तपासातून समोर येईलच. लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनीही आत्महत्येचा प्रयत्न करणे माणुस म्हणुन विचार करावयास भाग पाडणारी घडणा आहे.
आज माणसां-माणसांतील सहवास हरवला आहे. माणसांपेक्षा मोबाईल फोन जवळचा झाला आहे. मनमोकळे होणे, मनातील वेदना, सुख-दु:खाची देवाण-घेवाण थांबली आहे. भावना मांडण्याचे व्यासपीठ हरवले आहे. केवळ आर्थिक सुबत्ता आली की, माणुस सुखी होते असे नव्हे, आपल्या माणसाकडे आपलेपणाचे बोलणे व्हावे, ही प्रक्रियाच थांबल्याने माणसांच्या जीवनात प्रश्नांची गुंतागुत वाढली आहे. परिणामी आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न होणा-या घटना वाढत आहे. ही सामाजिकदृष्ट्या चिंतेची बाब आहे, असेही डॉ. हनुमंत किनीकर म्हणाले.