सातारा : प्रतिनिधी
संविधान हे पवित्र असून ते आपल्या प्रजासत्ताकाचा पायाभूत कायदा आहे. त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत असल्याचा जोरदार पलटवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
नागपुरातील संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधींनी लाल रंगातील पॉकेट संविधानाची प्रत दाखवली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला पृथ्वीराज चव्हाणांनी ‘एक्स’वर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाकडे संविधान असले पाहिजे.
या उद्देशाने राहुल गांधी संविधानाबद्दल प्रभावी जनजागृती करत आहेत. स्वत: पंतप्रधान मोदींनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पॉकेट संविधानाची प्रत भेट दिली होती, हे फडणवीसांना माहीत आहे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
संविधानावर भाजपा, आरएसएसचा लपून हल्ला
संविधान फक्त पुस्तक नाही, तर जगण्याचा अधिकार आहे. संविधान सर्वांना अधिकार देते. संविधानात सर्व जाती, धर्माचा, प्रदेशाचा आदर आहे. याच संविधानावर भाजपा आणि आरएसएस सातत्याने हल्ले करत आहेत. आरएसएस संविधानावर थेट हल्ला करू शकत नाही, ते लपून हल्ला करतात, असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी संविधान सन्मान संमेलनात केला होता.
काय म्हणाले होते फडणवीस?
लाल पुस्तक हातात घेऊन राहुल गांधी संविधानाचा गौरव करू इच्छित नाहीत तर त्यांच्यासोबत असलेल्या अर्बन नक्षलसोबत फुटीरतावाद्यांची मदत घेण्याकरता ते नौटंकी करत आहेत. संविधानाचा रोज ते अवमान करत आहेत. आजपर्यंत काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अवमानच केलाय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.