लातूर : प्रतिनिधी
भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. २६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ‘घर घर संविधान’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत आयोजित संविधान रॅलीला विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे संविधान स्तंभ येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने या रॅलीचा समारोप झाला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त यादवराव गायकवाड, भन्ते पय्यानंद थेरो यांच्यासह समाजभूषण पुरस्कार विजेते, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यावेळी उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तत्पूर्वी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महात्मा गांधी चौकमार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये यशवंत विद्यालय, कृपासदन कॉन्व्हेंट स्कूल, ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, राजमाता जिजामाता विद्यालय, परिमल माध्यमिक विद्यालय, व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देशिकेंद्र विद्यालय आणि समाज कल्याण वसतिगृह, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल.

