नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये आज २०२५-२६ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. यादरम्यान, डीएमकेचे खासदार दयानिधी मारन यांनी संस्कृत भाषेबाबत केलेल्या टिप्पणीमुळे लोकसभेतील वातावरण तापले. यावेळी दयानिधी मारन यांनी केलेल्या टीकेवर आक्षेप घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना खडेबोल सुनावले.
डीएमके खासदार दयानिधी मारन यांनी सभागृहात होत असलेल्या चर्चेचा अनुवाद इतर भाषांसोबत संस्कृत भाषेतही करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला. ते सभागृहात म्हणाले की, सरकार संसदेतील भाषणाचा संस्कृतमध्ये अनुवाद करून करदात्यांचे पैसे का वाया घालवत आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दयानिधी मारन यांच्या विधानाचा समाचार घेत या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले.
आधी सभागृहामधील भाषणं ही बंगाली, गुजराती, कन्न, मल्याळम, पंजाबी, उडिया यांसह १० भाषांमध्ये अनुवादित करण्याची सुविधा होती. दरम्यान, ओम बिर्ला यांनी आता त्यामध्ये संस्कृत, डोगरी, उर्दू आणि मैथिली भाषेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून डीएमकेचे खासदार दयानिधी मारन यांनी आक्षेप घेतला. तसेच घोषणाबाजी सुरू केली.
दयानिधी मारन यांनी घेतलेल्या आक्षेपाची गंभीर दखल घेत ओम बिर्ला यांनी त्यांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, संस्कृत ही भारताची प्राथमिक भाषा राहिलेली आहे. मी २२ भाषांचा उल्लेख केला आहे. केवळ संस्कृत भाषेचा नाही. तरीही तुम्ही केवळ संस्कृत भाषेवर का आक्षेप घेत आहात. हिंदी भाषेप्रमाणेच संस्कृतमध्येही सभागृहाच्या कामकाजाचा अनुवाद केला जाईल, असेही ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले.