लातूर : प्रतिनिधी
वृषाली पाटील यांनी कादंबरी आणि काव्यसंग्रहातून सकारात्मक समाजाची बांधणी व्हावी यासाठी लेखन केले आहे. मानवी जीवनात निर्माण झालेल्या प्रश्नांची चर्चा करताना सहजतेने ते प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी त्या आपल्या कादंबरी आणि काव्यसंग्रहातून मार्ग दाखवितात, असे मत वृषाली विक्रम पाटील लिखित प्रौढ कादंबरी स्मृतिछटा, काव्यसंग्रह ऋतूरंग आणि बाल काव्यसंग्रह जग आमचे सप्तरंगांचे या तीन पुस्तकांच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
वृषाली पाटील लिखित तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवार दि . १५ फेब्रुवारी रोजी भालचंद्र ब्लड बँक सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार अजय पांडे हे होते तर भाष्यकार म्हणून लेखक आणि व्याख्याते डॉ. राजशेखर सोलापुरे, समीक्षक आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारणीचे सदस्य डॉ. जयद्रथ जाधव, साहित्यिक धनंजय गुडसुरकर, बालसाहित्य समीक्षक प्रा. रामदास केदार यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी स्मृतिछटा या कादंबरीवर बोलताना डॉ.राजशेखर सोलापुरे म्हणाले की, वृध्दाश्रमाच्या विकृतीला नाकारत, मानवी नातेसंबंधात सुखद स्मृतींची संस्कृती निर्माण करण्यासाठी ‘स्मृतिछटा’ ही कांदबरी आग्रह धरते. आपल्या भोवतालच्या माणसांचं जगणं सहज व सुंदर व्हावे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची प्रेरणा ही कादंबरी देते. स्मृती आणि विस्मृती माणसाला मिळालेली देणगी आहे. या देणगीतून माणसाने जगण्याची नवी रीत निर्माण करावी तरच द्वेषाची दलदल नष्ट होईल.
प्रेमाचा ओलावा हा जगण्यातील सर्व समस्यांवरील उत्तम तोडगा आहे, हे ही कादंबरी अभिव्यक्त करते.यावेळी ऋतुरंग या काव्यसंग्रहावर बोलताना डॉ. जयद्रथ जाधव तसेच धनंजय गुडसूरकर यांनी मनोगत वक्त केले. अजय पांडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी लेखिका वृषाली पाटील यांनी आपल्या तीन पुस्तकाच्या निर्मितीचा आणि आपल्या साहित्य प्रवासाचा आढावा आपल्या मनोगतामधून घेतला. या कार्यक्रमात अभय साळुंखे, डॉ. गणेश बेळंबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संग्राम टेकले यांनी केले तर आभार अंकिता पाटील यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वर कोकरे यांच्या पसायदानाने झाली.