उन्हाळ््यामुळे राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे : प्रतिनिधी
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा विचार करून राज्यातील सर्व शाळा आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची वेळ सकाळच्या सत्रात करण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आणि प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले.
या निर्णयानुसार प्राथमिक शाळांसाठी ७ ते ११.१५ आणि माध्ममिक शाळांसाठी सकाळी ७ ते ११.४५ अशी वेळ निश्चित केली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद यांच्या शिक्षणाधिकारी व शिक्षण प्रमुखांना हे निर्देश देण्यात आले. स्थानिक परिस्थितीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येईल, असेही सूचित करण्यात आले.
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. पारा वाढल्याने याचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसू शकतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ नये, म्हणून विविध संघटनांकडून शाळांची वेळ सकाळी करण्याची मागणी केली जात होती. त्यात काही जिल्ह्यात सकाळच्या सत्रात शाळा सुरू झाल्या. त्यामुळे वेळापत्रकात विस्कळीतपणा आला होता. या पार्श्वभूमीवर सर्वच शाळा सकाळच्या सत्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला.