मुंबई : प्रतिनिधी
क्रिकेटमधील अनेक खेळाडूंची दोस्ती-यारी तुम्हाला माहिती असेल. यातीलच एक नाव म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीचे किस्से गाजले आहेत. नुकताच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यानंतर सचिन तेंडुलकरला ट्रोल करण्यात येत आहे.
विनोद कांबळी आज ५२ वर्षांचे आहेत. मात्र त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती पूर्णपणे फीट नसल्याचे म्हटले जाते. ३ डिसेंबर रोजी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती.
रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे अनावरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरांच्या सर्व शिष्यांना बोलावण्यात आले होते. या ठिकाणी मास्टर ब्लास्टर सचिनने विनोद कांबळीची भेट घेतली.
या कार्यक्रमासाठी सचिन व्यासपीठावर उपस्थित होता आणि थोड्या वेळाने विनोद कांबळी देखील त्या ठिकाणी आला. विनोद उजव्या बाजूच्या कोप-यात बसला होता. यावेळी सचिन स्वत:हून त्याला भेटण्यासाठी आला. सचिन भेटायला आल्यावर विनोदने त्याचा हात जोरात पकडला. यावेळी विनोद सचिनचा हात सोडायला तयार नव्हता आणि त्याला तिथेच थांबण्यासाठी सांगत होता.
मात्र कार्यक्रमाची वेळ झाली असल्याने सर्वांना त्यांच्या जागेवर जायचे होते. त्यामुळे सचिनला आपल्या जागेवर जावे लागले.