लातूर : प्रतिनिधी
दसरा-दिवाळीच्या तोंडावर शहरातील खाद्य तेल बाजारात पुन्हा तेजी निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढविल्याने खाद्यतेलाच्या किंमतीही वाढल्या आहेत. सोयाबीन, सूर्यफुल, करडई, शेंगदाणा तेलाचे भव लिटरमागे २० ते ३० रुपयांंनी वधारल्याने खाद्यतेल विक्रेत्यांनी सांगीतले. खोबरे तेल ४० रुपयांनी तर तीळाचे तेलही महागले आहेत.
महागाईत होरपळणा-या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गतवर्षी कच्च्या तेलावरील आयात शुल्क रद्द केले होते. त्यामुळे गगणाला भिडणा-या खाद्यतेलाच्या किंमती हळूहळू खाली घसरल्याने गृहिणींसह हॉटेलचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. जवळपास वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किंमती स्थिर होत्या. मात्र, दरवर्षी सणासुदीत तेलाची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे तेल बाजारात तेजी येते. सध्या दसरा-दिवाळी तोंडावर आली असताना केंद्राने कच्चे सूर्यफुल, कच्चे पामतेल आणि कच्चे सोयाबीनवरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढवले आहे. त्यामुळेख खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत.
सोयाबीन, सुर्यफुल, करडई, शेंगदाणा तेलाच्या किंमती लिटरमागे २० ते ३० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यासोबत खोबरे तेल आणि तीळाच्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. दरवर्षी सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेल दरवाढीचा भडका उडतो. हे काही नवीन नाही. मात्र, लिटरमागे तब्बल २० ते ३० रुपयांच्या दरवाढीने चटका बसला आहे. याचा महिन्याच्या बजेटवर परिणाम जाणवत आहे.