जालना : प्रतिनिधी
जालना लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांनी तब्बल १ लाख ९ हजार मतांनी दानवेंना पराभूत केले. मात्र या मतदारसंघात महायुतीतील नेत्यांनी दानवेंचे काम केले नसल्याची कुणकुण होत आहे.
राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीत रावसाहेब दानवेंऐवजी कल्याण काळेंचा प्रचार केल्याचे एकप्रकारे कबूल केले होते. कल्याण काळे यांनी नुकतीच सत्तारांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. तेव्हा सत्तारांनी काळेंच्या डोक्यावर हात ठेवत ते चांगले मित्र आहेत आणि निवडणुकीत मदत केल्याची कबुली दिली.
त्यामुळेच मागच्या काही दिवसांपासून भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. आता भाजपचे सिल्लोड शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनीही शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचे संकेत देत नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने एक आंदोलन करून सत्तारांच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, अब्दुल सत्तार हे महायुतीमध्ये नाराज असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेशी आपला प्रासंगिक करार असल्याचे विधान त्यांनी केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपल्यावर विश्वास आहे तोपर्यंत आपला शिवसेनेशी प्रासंगिक करार कायम आहे. असे सांगत सत्तार यांनी सूचक इशारा दिला होता.