पावसाळ्यात पर्यटनस्थळी दुर्घटना घडतात तेव्हा हळहळ वाटते. असे व्हायला नको होते असेही वाटून जाते. श्रद्धास्थानी भाविकांच्या वाट्याला दु:ख येते तेव्हा ऐकणा-याचा, प्रत्यक्षदर्शींचा जीव अर्धमेला होतो. अनेकवेळा हवामान विभागाचा अंदाज चुकतो तेव्हा असे का होते असा प्रश्न पडतो. अंदाजाची अचूकता नसणे हे हवामान विभागाचा अंदाज चुकण्यामागचे प्रमुख कारण असू शकते. पर्यटन क्षेत्रात दुर्घटना घडतात तेव्हा त्यामागे पर्यटकांचा फाजील आत्मविश्वास, अतिउत्साह, स्टंटगिरी ही कारणे असू शकतात. श्रद्धास्थानी भाविकांच्या वाट्याला दु:ख का यावे? सत्संग जर पवित्र असेल तर तेथे असंगाचा शिरकाव कसा काय होऊ शकतो? श्रद्धा कोणावर असावी, कुठे, का असावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात मंगळवारी जी दुर्घटना घडली त्यामुळे कुणाही सुहृदाचा थरकाप उडेल. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्याच्या फुलराई गावात एका सत्संग कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी होऊन किमान १३० भाविकांचे मृत्यू झाले असून दोनशेहून अधिक भाविक जखमी झाले असावेत अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सत्संग कार्यक्रमासाठी हजारो भाविक जमले होते. दुर्घटना घडण्यापूर्वी परमेश्वर चरणी लीन झालेल्या भाविकांचा जल्लोष सुरू होता, मंगलमय वातावरणात क्षणार्धात अमंगल घडले आणि केवळ आक्रोश अन् किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडताना चेंगराचेंगरी झाली असे सांगण्यात येते. ज्या हॉलमध्ये सत्संग आयोजित करण्यात आला होता तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. सत्संग संपल्यानंतर बाहेर पडताना गर्दीमुळे धक्काबुक्की झाली, लोक एकमेकांच्या अंगावर कोसळले. चेंगराचेंगरीत पायदळी तुडवले गेल्याने अनेकांचा मृत्यू झाला. घटनास्थळी चपला व बुटांचा खच पडला होता. घटनास्थळाला एखाद्या युद्धभूमीसारखे स्वरूप आले होते. सर्वत्र मृतदेह पडले होते. त्यातच काही जिवंत असलेले जखमी विव्हळत होते. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. सत्संग संपल्यानंतर भाविकांची घरी जाण्यासाठी घाई सुरू झाली. त्यातच दुस-या बाजूने सत्संग करणा-या बाबाचा ताफा बाहेर पडला. काही जणांनी तिकडे धाव घेतली.
त्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी सुरू झाली. त्यात महिला आणि लहान मुले तुडवली गेली. यावेळी सत्संगाचे आयोजन करणा-यापैकी कोणी वाचवायला वा लोकांना शांततेचे आवाहन करायला पुढे आले नाही. मृतांची आणि जखमींची संख्या इतकी मोठी होती की, जखमींना टेम्पोमधून रुग्णालयात नेण्यात आले. दुर्घटनेनंतरची परिस्थिती भयावह होती. रुग्णालयाच्या बाहेर जमिनीवर मृतदेह विखुरलेले होते. रुग्णालयात लोक डॉक्टरांची वाट पाहत होते मात्र एकच डॉक्टर असल्याने जखमींना उपचार मिळू शकले नाहीत. चेंगराचेंगरीत जखमी व बेशुद्ध झालेल्यांना तसेच मृतदेहांना ट्रक, ट्रॅक्टर, बस यासह मिळेल त्या वाहनाने एटा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. काहींना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. अनेक जखमींनी रस्त्यातच प्राण सोडला. रुग्णालयात कोणतीही व्यवस्था नव्हती, ऑक्सिजन सिलिंडर नव्हते. आता हे नेहमीचेच झाले आहे. दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले, हेही नेहमीचेच! हाथरस जिल्ह्यात प्रवचन देणा-या बाबाचे नाव नारायण साकार विश्व हरी ऊर्फ भोलेबाबा असे आहे. तो पूर्वी पोलिस दलात होता म्हणे. स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्याने २० वर्षांपूर्वी सत्संग सुरू केला. कोरोना काळातही त्याचा सत्संग वादात सापडला होता. कधी पांढ-या कपड्यात तर कधी टाय लावून सत्संग करणारा हा बाबा उत्तर प्रदेश व राजस्थानात प्रसिद्ध असून त्याचे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांबरोबर संबंध आहेत म्हणे. सध्या हे बाबा आणि सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करणारे फरार असून पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बम बम भोलेबाबाचे स्तोम सध्या अनेक राज्यांत माजले असून त्यांच्यापुढे राजकीय नेते नतमस्तक होतात. त्यामुळे या बाबा मंडळींना प्रतिष्ठा मिळते. महाराष्ट्रही याला अपवाद नाही. भोलेबाबाच्या सत्संगाला २० हजारहून अधिक अनुयायी उपस्थित होते असे सांगितले जाते. हॉल गर्दीच्या तुलनेत छोटा होता, त्यामुळे हॉलबाहेरही अनुयायी उभे होते. सत्संगानंतर भोलेबाबाचा ताफा हॉलबाहेर पडला. तोपर्यंत सुरक्षा रक्षकांनी गर्दी रोखून धरली होती.
ताफा बाहेर पडताच सुरक्षा रक्षकांनी गर्दीला मोकाट सोडले. भोलेबाबांची पायधूळ (चरणरज) कपाळी लावण्यासाठी, गोळा करण्यासाठी अनुयायांमध्ये चढाओढ सुरू झाली. त्याचे रुपांतर चेंगराचेंगरीत झाले म्हणे. हे सारे खरे असेल तर हा शुद्ध वेडेपणा नव्हे काय? पण हे सांगणार कोण? कारण कोणाच्या भावना, श्रद्धा कशा असतील, कोठे असतील ते सांगता येत नाही. कळतही नाही अन् वळतही नाही अशी स्थिती! काही सांगायला जावे तर भावना दुखावल्या जाण्याच्याच शक्यता अधिक! धार्मिक कार्यक्रमात मोठ्या दुर्घटना घडण्याचे प्रकार देशात अनेकवेळा घडले आहेत परंतु त्यापासून आपण काहीच बोध घेतलेला नाही. देवळात, मंदिरात, सत्संग कार्यक्रमात, उत्सवात चेंगराचेंगरीच्या घटना घडणार हे जणू काही आपण गृहितच धरले आहे. पण यात निष्पापांचे बळी जातात त्याचे काय? भोंदू बाबा, भोले बाबा यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हाच अशा दुर्घटना घडण्याचे थांबेल.