कोल्हापूर : प्रतिनिधी
सदाभाऊंचे वक्तव्य निषेधार्ह आहे. शरद पवार यांच्याविषयी अशा प्रकारचे वक्तव्य करत असताना त्या पक्षातील नेते व्यासपीठावर हसत होते. त्याला हसून दाद देणे म्हणजे संताप आणणारे कृत्य आहे. त्यावर हसणे म्हणजे त्यांची त्याला प्रस्तावना होती, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात केला.
दरम्यान, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार अरुण सोनवणे यांच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. त्यावेळी राजू शेट्टी म्हणाले, शरद पवार आणि माझे कधीच जमले नाही. त्यांच्या व्यंगावर आणि दुखण्यावर बोलणे हे मला पटलेले नाही. कधीकाळी त्यांनी माझी जात काढली होती. पण त्यांना मी उत्तर दिले नाही.
अनेक दिग्गज नेते महाराष्ट्राची संस्कृती विसरले नाहीत. त्यांनी कधीच आपली पातळी सोडली नव्हती. पृथ्वीराज चव्हाण असेपर्यंतच महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती टिकली, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, हद्दवाढीच्या नावाखाली ग्रामीण भागातील जमिनीवर आरक्षण टाकण्याची भीती घालून जमिनी खरेदी केल्या. जमिनी खरेदी करून उपनगरात गुंठामंत्र्यांनी अमाप पैसा कमावला. या सर्वांमध्ये दक्षिणमधील उपनगर आणि ग्रामीण भाग भरडला जातोय. दक्षिणमधील गावांकडे अमोल महाडिक आणि बंटी पाटील यांनी देखील लक्ष दिले नाही. ज्यावेळी असे प्रश्न घेऊन सामान्य नागरिक या दोघांकडे जातात, त्यावेळी ते दुर्लक्ष करतात. कारण गुंठामंत्र्यांचे संबंध ते जोपासत असतात. त्यामुळे या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी परिवर्तन महाशक्तीकडून अरुण सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
परिवर्तन महाशक्तीला आघाडीचे आव्हान पेलवत नाही आणि आमचा उमेदवार जड जात असल्यानेच फोडाफोडीचा प्रयत्न केला जात आहे. पण आमचे दु:ख हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा कमी आहे. दोन गेले असले तरी दोन माजी आमदार आमच्या पक्षात आलेत. जिल्ह्यात दोन स्वाभिमानीचे आमदार दिसतील आणि मुसंडीही दिसेल. संघटना फोडली की राजू शेट्टी कुमकुवत होतील, असे अनेकांना वाटते. पण जुना गेला की नवा लगेच तयार होतो, हे चळवळीचे वैशिष्ट्य आहे. मी थांबलो तरी चळवळ थांबणार नाही, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.
राज्यात परिवर्तन महाशक्तीला लक्षणीय यश मिळणार आहे. तो धक्का सहन होत नसल्यानेच आमची कार्यकर्ता फोडण्याची वेळ आली आहे. जेवढा चेंडू दाबाल तेवढाच तो वर येईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.