सोलापूर – सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव सोहळा आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा महोत्सव १७ ते १९ मे २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
या भव्य महोत्सवासाठी देशभरातून अनेक संत-महंत, मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांतील मंत्री, प्रखर हिंदुत्वनिष्ठ, विचारवंत, अधिवक्ता, उद्योजक, संपादक आदी मान्यवरांसह २० हजारांहून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला आर्ट ऑफ लिव्हिंगचे . संतोष घोडगे, सांस्कृतिक न्यासाचे जयंत मिरिंगकर, भारत स्वाभिमानाचे . कमलेश बांदेकर, ब्राह्मण महासंघ गोवाचे राज शर्मा, गोमंतक मंदिर महासंघाचे . जयेश थळी, कुंडई तपोभूमी येथील पद्मनाभ संप्रदायाचे सुजन नाईक, जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी . अनिल नाईक, तसेच उद्योजक राघव शेट्टी आणि कदंबाचे माजी महाव्यवस्थापक संजय घाटे हे उपस्थित होते.या महोत्सवात देशभरातून येणारे संत, महंत तथा धर्मगुरु यांच्या संतसभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र, धर्म, संस्कृती आणि हिंदु समाज यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ते आपल्या ओजस्वी वाणीने मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शनही होणार आहे.