बीड : प्रतिनिधी
बीडच्या परळी गावात सप्तशृंगी देवीच्या मूर्तीस्थापनेच्या मिरवणुकीदरम्यान अंधश्रद्धेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगराध्यक्षांनी रस्त्याच्या मधोमध कोंबड्याचा बळी दिला. तसेच त्याच्यावर नागवेलीची पाने, हळद, कुंकू आणि लिंबू टाकून जादूटोणा करण्याचा प्रकार केला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी माजी नगरध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
परळीमध्ये सप्तशृंगी देवीच्या मूर्तीस्थापनेची मिरवणूक निघाली होती. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी रस्त्याच्या मधोमध अघोरी कृत्य केले. त्यांनी कोंबड्याचा बळी दिला. नंतर त्याच्यावर नागवेलीची पाने, हळद, कुंकू आणि लिंबू टाकून जादूटोणा करण्याचा प्रकार केला.
माजी नगराध्यक्षांनी जादूटोणा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बालाजी ढगे यांनी केला. त्यांनी यासंदर्भात पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली. या घटनेनंतर परिसरात अंधश्रद्धेला खतपाणी मिळाले, तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला.
ही घटना सप्तशृंगी देवीच्या धार्मिक मिरवणुकीदरम्यान घडल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी दीपक देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. दीपक देशमुख यांनी जादूटोण्याचा प्रकार का केला? मध्यरस्त्यावर कोंबड्याचा बळी देण्यामागचे कारण काय? याचाही तपास सुरू आहे.