26.7 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeसंपादकीयसमांतर सिनेमाचा शहेनशहा

समांतर सिनेमाचा शहेनशहा

चित्रपटांना केवळ करमणुकीचे साधन न मानता प्रेक्षकाला विचारप्रवण बनविण्याचे प्रभावी साधन मानणारे, समांतर सिनेमा लोकप्रिय करणारे, गंभीर असो की हलकेफुलके कथानक तितक्याच समर्थपणे हाताळणारे आणि आपले वेगळेपण ठसविणारे प्रयोगशील दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. १४ डिसेंबरला त्यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली होती. ब-याच दिवसांपासून किडनीच्या विकाराने ते त्रस्त होते. मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

त्यांच्या पश्चात पत्नी नीरा आणि कन्या पिया असा परिवार आहे. श्यामसुंदर श्रीधर बेनेगल यांचा जन्म त्रिमुलागिरी, हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर बेनेगल हे उत्तम छायाचित्रकार होते. श्याम बेनेगल यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. पालकांकडूनही त्यांना प्रोत्साहन मिळाले. अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर बेनेगल यांनी मोठ्या जाहिरात संस्थेत लेखनाचे काम केले. त्यानंतर जाहिरातपट आणि लघुपट यासाठी लेखन करतानाच त्यांनी या क्षेत्रातील तांत्रिक अंगांचा सखोल अभ्यास केला. होमी भाभा अधिछात्रवृत्ती घेऊन त्यांनी बोस्टन आणि न्यूयॉर्क येथील दूरदर्शन माध्यमांसाठी लहान मुलांचे लघुपट तयार केले. त्यानंतर त्यांनी भारतात येऊन ‘अंकुर’ हा पहिला चित्रपट तयार केला.

त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कलात्मक, समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट यांची सांगड घालण्याचे महत्त्वपूर्ण काम बेनेगल यांनी केले. एनएफडीसीसाठी त्यांनी काम केले. तसेच पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत त्यांनी अध्यापन केले, या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. स्वातंत्र्योत्तर काळात पन्नाशीच्या दशकातच सुरू झालेली समांतर चित्रपटांची चळवळ सत्तरीच्या दशकामध्ये लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम बेनेगल यांनी केले. बेनेगल, गोविंद निहलानी, महेश भट्ट यांच्यासारखे दिग्दर्शक, स्मिता पाटील, शबाना आझमी, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, दीप्ती नवल, फारूख शेख अशा ताकदीच्या कलाकारांनी सामान्य चित्रपटरसिकांना उथळ मनोरंजनाच्या पलिकडील जग दाखवणा-या समांतर चित्रपटांकडे खेचून आणले. समांतर चित्रपट केवळ बुद्धिमान प्रेक्षकांसाठी असतात, सर्वसामान्यांना त्यात फारशी रुची निर्माण होऊ शकत नाही असे अनेक समज त्यांनी खोडून काढले.

तरुण वयातच बेनेगल यांनी चित्रपटनिर्मिती सुरू केली. चित्रपटांच्या आवडीतून त्यांनी हैदराबाद फिल्म सोसायटी स्थापन केली. श्याम बेनेगल हे समांतर सिनेमाचे ब्रँड अ‍ॅम्बॅसेडरच होते. ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’ असे अनेक चित्रपट त्यांनी दिले. ‘अंकुर’मधून शबाना आझमीची हिंदी चित्रपटसृष्टीला ओळख झाली. बेनेगल यांना १८ राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. ‘महाभारत’ या संकल्पनेवर त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘कलयुग’ हा सिनेमा आजही वाखाणला जातो. सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याचा विक्रम श्याम बेनेगल यांच्या नावावर आहे. त्यांना १९७६ मध्ये ‘पद्मश्री’ आणि १९९१ मध्ये भारताचा तिसरा सर्वाेच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. तसेच एक फिल्मफेअर पुरस्कार आणि नंदी पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे.

त्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ भारतीय सिनेविश्वाची सेवा केली. २००५ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर आधारित ‘भारत एक खोज’ या दूरदर्शनवरील महत्त्वाकांक्षी मालिकेचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. ‘सरदारी बेगम’ हा त्यांचा उर्दू सिनेमाही गाजला होता. श्याम बेनेगल यांनी २४ चित्रपट, ४५ माहितीपट आणि १५ पेक्षा जास्त जाहिरातपर चित्रपट बनवले आहेत. ‘झुबैदा’, ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस : द फॉरगॉटन हिरो’, ‘मंडी’, ‘आरोहण’, ‘वेलकम टू सज्जनपूर’ यासारखे डझनभर उत्तम चित्रपट त्यांनी दिले. बेनेगल यांनी भारतीय चित्रसृष्टीला नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, अनंत नाग, शबाना आझमी, स्मिता पाटील असे उत्तम कलाकार दिले. बेनेगल यांचा पहिला चित्रपट ‘अंकुर’ हा अस्पृश्यता, जमीनदारी या विषयावर आधारित होता. तो काही प्रचारकी सिनेमा नव्हता, पण ती कथा समाजव्यवस्थेतील भेदावर आधारित होती.

‘निशांत’मध्ये सरंजामशाही विषयावरील कथा होती. आपण त्या व्यवस्थेत पूर्णत: अडकलो होतो. ‘मंथन’ हा सहकाराची ताकद दाखवणारा सत्य परिस्थितीवर आधारित चित्रपट होता. आपल्या देशाला पुढे जाण्याचा सहकार हा मार्ग असू शकेल, हे सुचवणारी ती कथा आहे. हे सर्व देशाच्या विकासाशी, लोकांच्या प्रश्नाशी भिडलेले विषय होते. याचा अर्थ असा नव्हे की बेनेगल फक्त समस्यांवर आधारित चित्रपट बनवू इच्छित होते पण त्यांच्या अंगात जे मुरलेले होते ते आपोआपच बाहेर पडत होते. त्यांच्याकडून केवळ मनोरंजनात्मक चित्रपट निर्माण होणे त्यामुळे शक्य नव्हते. सत्यजित रे यांचा ‘पथेर पांचाली’ बघितल्यानंतर बेनेगल यांना त्यांचा आवाज सापडला. केवळ मनोरंजनात्मक सिनेमे बनवण्यापेक्षा त्यांना स्वत:चे वेगळे असे काहीतरी बनवायचे होते, ज्याचा वास्तवाशी संबंध असेल, लोकांच्या ख-या आयुष्याच्या धाग्याची ज्यात वीण असेल. बेनेगल यांना कोणाचेही केवळ अनुकरण करायचे नव्हते तर स्वत:चे जगणे, आलेले अनुभव याची घुसळण होऊन जे बाहेर निघेल त्यातून स्वत:चा मार्ग शोधायचा होता.

प्रेक्षकांना चित्रपटाची कथा आपली वाटायला हवी असा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून त्यांनी केवळ सवंग करमणुकीसाठी भडक नाट्यमयता आपल्या चित्रपटातून वापरली नाही. आपला सिनेमा हा आशावादी विचार मांडत संपावा याबद्दल ते आग्रही होते. बेनेगल यांच्या चित्रपटांचे विषय, त्यांची वास्तवदर्शी मांडणी आणि प्रस्थापित कलाकारांऐवजी नवख्या कलाकारांना दिलेली संधी यामुळे प्रेक्षकांना भावले. बेनेगल यांनी दिग्दर्शक म्हणून स्वत:ला मर्यादित ठेवले नाही. आपल्या कारकीर्दीत त्यांनी सुमारे ९०० हून अधिक जाहिराती केल्या. माहितीपट आणि लघुपटांच्या दिग्दर्शनातही ते मनापासून रमले. श्याम बेनेगल यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टी आणि दूरचित्रवाणीचा वैभवशाली अध्याय संपुष्टात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची दिशा बदलणारा माणूस म्हणून ते स्मरणात राहतील. बेनेगल यांना भावपूर्ण आदरांजली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR