लातूर : प्रतिनिधी
आजची नवीन पिढी वाचत नाही व समाज माध्यमांसमोर काहीही बोलतात किंवा आपल्या पुस्तकातून लिहितात. लेखकांनी लोकांमध्ये मिसळून समाजात वावरले पाहिजे. मराठी बाणा विसरता कामा नये. लेखन हे लेखन नव्हे तर पुनर्लेखन हे खरे लेखन असते. मराठी साहित्याला समृद्ध करण्यासाठी व समाजाच्या उत्थानासाठी लेखकांनी साहित्य आणि संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे, असे ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
शिव छत्रपती शिक्षण संस्थाद्वारा संचालित येथील राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त) व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य स्तरीय पहिले आद्यकवी मुकुंदराज मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष म्हणुन ज्येष्ठ कांदबरीकार विश्वास पाटील बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष म्हणून शिव छत्रपती शिक्षण संस्था लातूरचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव इंजि. गोपाळ शिंदे, डॉ. शिवाजीराव सूर्यवंशी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरु मधुकर गायकवाड, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य प्रा. श्रीधर नांदेडकर, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, पर्यवेक्षक डॉ. भीमराव पाटील, डॉ. संभाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार विक्रम काळे यांनी सांगितले की, या डिजिटल माध्यमांच्या काळातही वृत्तपत्रे व साहित्य वाचकांची संख्या वाढली आहे. कारण साहित्य समाज जीवनाला उभारी देण्याचे व माणसांना जोडण्याचे काम करते. पुस्तकांच्या वाचनातून माणूसाचे जीवन समृद्ध होते. म्हणून अशा साहित्य संमेलनाच्या आयोजनाची खरी गरज आहे. डॉ. गोपाळराव पाटील यांनी या संमेलनाच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट साहित्यकार निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने साहित्य अभ्यासक उपस्थित होते. या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी केले. आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख डॉ. संभाजी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत चव्हाण व प्रा. सुदर्शन पाटील यांनी केले.
संमेलनाच्या कथाकथन सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ कथाकार प्रा. भास्कर बडे यांच्या उपस्थितीत जळकोटचे कथाकार विलास सिंदगीकर व लातूरच्या प्रसिद्ध कथा लेखिका मेनका धुमाळे यांनी कथाकथनाचे सादरीकरण केले. परिसंवादात अभिजात मराठी भाषा या सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. शेषेराव मोहिते यांनी ‘जागतिक दृष्टिकोनातून मराठी भाषा’ या विषयावर मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजीनगरचे डॉ. महेश खरात यांनी ‘अभिजात मराठी भाषा आणि भाषकांची जबाबदारी’, डॉ. बालाजी इंगळे यांनी ‘मराठी-कन्नड अनुबंध’, डॉ. वैशाली गोस्वामी यांनी ‘आद्यकवी मुकुंदराज- मराठी साहित्याचा आरंभ’या विषयांवर मार्गदर्शन केले. दुपारी निमंत्रितांचे व विद्यार्थी कवी संमेलनात बेळगावचे आबासाहेब पाटील हे अध्यक्ष होते.
या कविसंमेलनात कवी योगीराज माने, अनिल गव्हाणे, रमेश चिल्ले, प्रा. विश्वंभर इंगोले, डॉ. चंद्रशेखर मलकमपट्टे, शैलजा कारंडे, डॉ. संतोष देशमुख, नरसिंग इंगळे, प्रा. नयन भादुले, प्रमोद माने, रामदास कांबळे, गोविंद जाधव, ऋचा पत्की यांनी कवितांचे सादरीकरण केले. यामुळे रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी भारत सातपुते यांनी केले. सदर संमेलन यशस्वी होण्यासाठी डॉ. विजयकुमार करजकर, डॉ. गोविंद उफाडे, डॉ. शिवराज काचे, प्रा. बापुसाहेब जवळेकर व महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांनी प्रयत्न केले. साहित्य संमेलनानिमित्त राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत सकाळी पारंपरिक वेशभूषा परिधान करुन ढोल-ताशांच्या गजरात महाविद्यालयापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली.