मेहकर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी सहाच्या सुमारास चालकाच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात झाला. मुंबईहून पुसदकडे जाणारी खाजगी प्रवासी बस मेहकर टोल नाक्याजवळ अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती पुढील कारवर आदळली, ज्यामुळे कारचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे तब्बल एक तास डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत आक्रोश केला.
सध्या गंभीर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, चालक-वाहकांच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
















