पाथरी : विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात काम केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार असल्याने आगामी निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करा. युवा नेते सईद खान व त्यांचे सहकारी विकासासाठी झटत असल्याने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू.
काम करणा-या माणसाच्या पाठीशी तुम्हीही उभे रहा व महायुती सरकारने आणलेल्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा असे आवाहन पाथरी येथील सभेत बोलताना खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.
पाथरी शहरातील अंजली मंगल कार्यालय येथे मंगळवार, दि.८ ऑक्टोबर रोजी रात्री आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. सायंकाळी ६ वाजता आयोजित मेळावा पावणे दोन तास उशिरा सुरू झाला तरीही खा. शिंदे यांना ऐकायला आलेले लोक जागचे हलले नाही. यावेळी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान, शिवसेना नेते अर्जुन खोतकर, माजी खा. संजय निरुपम, मा.आ.अनिल जगताप, माजी आ.माणिकराव आंबेगावकर, शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश सचिव आसेफ खान, भाऊ चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख नाना टाकळकर, शिवसेना प्रदेश उपाध्यक्ष हसीब खान, युवा जिल्हाप्रमुख अमोल भाले पाटील,
उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, माजी नगराध्यक्ष मुंजाजी भाले पाटील, शिवसेना नेते चक्रधर उगले, तालुकाप्रमुख विठ्ठल रासवे, पाथरी विधानसभा प्रमुख पप्पू घांडगे, शिवसेना शहराध्यक्ष युसुफोद्दीन अन्सारी, रघुनाथ दादा शिंदे, दिलीप हिवाळे, सतीश वाकडे, भीमराव वैराळे, अनिल ढवळे, शिवसेना पाथरी विधानसभा मागासवर्गीय विभाग प्रमुख एल.आर. कदम, के.पी. पांढरे, खदिर बापू विटेकर ,खालेद शेख, शिवसेना नेत्या वंदना जोंधळे, रेखा मणेरे, प्रतिभा अंभोरे, कमल राठोड, राजकिरण शिंदे, मुक्ता डोंगरे आदींसह हजारो शिवसैनिकांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खा. शिंदे म्हणाले की, लोकप्रतिनिधी नसताना सईद खान यांनी केलेले काम चांगले आहे. त्यांनी वारंवार मुख्यमंत्र्यांकडे विकास कामांसाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या असल्याचे ते म्हणाले. सईद खान यांच्या प्रयत्नातून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातुन साईबाबा मंदिर विकासासाठी ९१ कोटी ८० लाखांचा निधी, शहराच्या विकासासाठी २५ कोटी, मुख्यमंत्री सहायता निधी मधून १५ कोटींची मदत व रोजगार मेळाव्यातून ५ हजार २०० लोकांना रोजगार दिला असे सांगत सईद खान यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले.