मुंबई : प्रतिनिधी
केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे याच मुद्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने ही कसली वसुली सुरू केली आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, शेअर बाजारात सोमवारी (ता. ७ एप्रिल) मोठी पडझड झाली. याचा फटका संपूर्ण जगाला बसला. पण दुसरीकडे मात्र जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या. परंतु, असे असले तरी केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या अबकारी करामध्ये दोन रुपयांनी वाढ केली. पण याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार की नाही, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, केंद्र सरकारने सोमवारीच घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे सामान्यांचे बजेट कोलमडलेले आहे. कारण गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
याच मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने ही कसली वसुली सुरू केली आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गॅस सिलिंडरमध्ये झालेल्या दरवाढीबाबत विचारणा करण्यात आली. याबाबत ते म्हणाले की, जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती या कमी झालेल्या आहेत. तर मग भारतामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा गॅस सिलिंडरच्या किमती का वाढाव्यात? ही कसली वसुली चालू आहे? ही कसली पाकिटमारी सुरू आहे? म्हणजे एका बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर जर भारतीयांना दिलासा मिळत नसेल तर निर्मला सीतारामन महागाईत आणखी तेल ओतण्याचे काम करत आहेत. सिलिंडर ५० रुपयांनी वाढले आहे. लाडक्या बहिणींचे बजेट कोलमडले आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.
तर, माझे स्मृती इराणी, कंगना राणावत यांना आवाहन आहे, ज्या भाजपाच्या महिला नेत्या आहेत. स्मृती इराणी यांना आम्ही आंदोलनासाठी आमंत्रित करत आहोत. त्यांनी आमच्या महिलांचे आंदोलनाचे नेतृत्व करावे. हा राजकीय प्रश्न नसून, हा या देशातील गृहिणींचा जीवनमरणाचा प्रश्न आहे. जेव्हा यूपीएचे राज्य होते, तेव्हा स्मृती इराणी महागाईविरोधात महिलांचे नेतृत्व करत होत्या. तेव्हा त्या रस्त्यावर सिलिंडर टाकून बसल्या होत्या. पण आता सिलिंडर आम्ही पुरवू, त्यांनी फक्त रस्त्यावर बसायला यावे. अशा प्रकारचे आंदोलन शिवसेना करणार आहे, अशी माहिती यावेळी खासदार संजय राऊत यांनी दिली.
तर, ज्या हिशेबात जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत, त्या पाहता भारतासारख्या देशात पेट्रोल आणि डिझेल हे ५० रुपयांवर स्थिर असायला हवे आणि सिलिंडरच्या किमती सुद्धा किमान ४०० रुपयांनी खाली यायला हव्यात. आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका, कारण ते आम्हालाही कळते. या देशामध्ये प्रत्येक बाबतीत सामान्य गृहिणींची लूट सुरू आहे. निवडणुका आल्या की ‘लाडकी बहीण’सारखी एखादी योजना आणायची, ती चार महिने राबवायची आणि मग त्या लाडक्या बहिणींनाही वा-यावर सोडायचे हे सुरू आहे, असा टोला यावेळी खासदार संजय राऊत यांनी लगावला.