कोल्हापूर : सातारा
छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला. यानंतर शाहू महाराज विकिपीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही. कारण ज्याला जे वाटते ते तो विकिपीडियामध्ये टाकत आहे. पण ज्यांनी कोणी चुकीची माहिती टाकली त्याचा निषेध केला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने त्यासंदर्भात कारवाई करून योग्य केले, पण त्यांनी केलेली कारवाई कमी आहे. खरंतर ट्विटर आणि विकिपीडियावर अॅक्शन घेतली पाहिजे, अशी भूमिका खासदार शाहू महाराज यांनी मांडली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत असताना दुसरीकडे विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर पाहायला मिळत आहे. त्यातच अभिनेता कमाल खानने विकिपीडियावरील छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा मजकूर खरा असल्याचा दावा करत तो शेअर केला आहे. त्यामुळे विकिपीडिया आणि कमाल खानविरोधात शिवप्रेमींमध्ये संताप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याची गंभीर दखल घेत राज्यातील सायबर सेलला ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मशी संपर्क साधून मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणावर आता छत्रपती शाहू महाराज यांनी भाष्य केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती आज (१९ फेब्रुवारी) राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. करवीर संस्थानच्या वतीनेही पारंपरिक रीतीरिवाजामध्ये आज शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. ऐतिहासिक भवानी मंडप येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून पारंपरिक लवाजम्यात नर्सरी बागेतील शिवमंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.