छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
नागपूरमध्ये आरोपीचे घर पाडले गेले, आम्ही या कृतीचा निषेध करतो. राज्य सरकारने सर्व न्यायालयांना कुलूप लावले पाहिजे. आता आम्हाला न्यायालयाची गरज नसेल, आम्ही आमचे निर्णय घेऊ, असे जाहीर करा, असे आव्हान एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिले. राज्यातील प्रमुख प्रश्न वळवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे तयार करणा-या कुणाल कामरा याचे आम्ही समर्थन करतो. आम्ही त्याच्यासोबत राहू, असे देखील इम्तियाज जलील यांनी सांगितले.
नागपूर बुलडोझर कारवाईचा निषेध
नागपूरमध्ये जे काही घडले, त्याची आम्ही निंदा केली. जी काही हिंसा घडली, त्याची देखील निंदा केली. आज जे काही नागपूरमध्ये घडले, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझर कल्चर आणलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं. ही सर्व घरे तुम्ही बांधून द्या, असे उत्तर प्रदेश सरकारला सांगितले. आज तीच संस्कृती भाजपाने राज्यात आणली आहे.
जे नागपूरमध्ये पाहायला मिळालं, जे कुणी दंगलीत सहभागी होते, त्यांच्यावर कारवाई करा. जो कुणी कायदा हातात घेत असेल, त्यांच्यावर कारवाई करा. पण तुम्ही घर तोडणार, त्या घरामध्ये कुणाची तरी आई राहते. त्याच्या आई, मुलांचं, बायकोचा काय दोष आहे. जर असाच कायदा चालणार असेल, तर आम्ही महाराष्ट्र सरकारला सांगतो, तुम्ही सर्व न्यायालयांना टाळे ठोका आणि आता आम्हाला न्यायालयाची गरज नसेल, आम्ही आमचे निर्णय घेऊ असे जाहीर करा, असे आव्हान एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिले.
आम्ही कुणाल कामरासोबत :
वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा विधानसभेत यायला पाहिजे होता. संतोष देशमुखसारखे प्रकरण आहे, पण हे सर्व मुद्दे वळवण्यासाठी सरकार यशस्वी झाले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गुंडांचा मी जाहीर निषेध करतो. जेव्हा एका साधूने मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वक्तव्य केले, तेव्हा हेच एकनाथ शिंदे म्हणाले होते, की त्याच्या केसाला आम्ही हात लावू देणार नाही. एकनाथ शिंदे यांना विचारतो, एक कॉमेडियन छोटीशी गोष्ट तुमच्याबद्दल सांगतो आणि तुमचे गुंड जाऊन त्याचं ऑफिस तोडतात, त्याच्यावर गुन्हा दाखल करतात. मी कुणाल कामराचं जाहीर समर्थन करतो.