पुणे : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सुबत्ता आणि आधार देण्याच्या हेतूने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली. मात्र यापेक्षा महिलांना नेमकं काय हवंय? याबाबत शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी वाचा फोडली. महिलांना पैसे नकोत पण महिलांना नेमकं काय हवंय? याबाबत आताचं सरकार अज्ञानी असून आताच्या सरकारला महिला समजल्याच नसल्याचा आरोप देखील रोहिणी खडसेंनी केला आहे.
दरम्यान, ‘लाडकी बहीण, लाडकी बहीण करताय, यापेक्षा आम्हा महिलांना सुरक्षित वातावरण हवंय. आम्हाला १५०० रुपये देऊन, तुम्ही आमचं मत घेऊ इच्छिता. पण आमचे मन यात रमलेले नाही. माझ्या माता-भगिनींच्या मुलाला नोकरी हवी, बापाने अन् पतीने शेतात घाम गाळून पिकविलेल्या पिकाला भाव हवाय. आम्हाला चिंता असते, पिकाला भाव मिळाला नाही तर माझा बाप आत्महत्या करणार नाही ना? माझ्या भावाच्या हातात नोकरी असेल तर आम्हाला रक्षाबंधनाला माहेरी जाण्यात आनंद आहे? तुमच्या १५०० रुपयांमध्ये हे सुख मिळणार आहे का? पण या निर्लज्ज सरकारला याचे काही देणे-घेणे नाही. त्यामुळे यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच. यांना वाटतं महिलांचे मन फक्त पैशात अडकले आहे’ असे म्हणत रोहिणी खडसे यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली.
अत्याचारांच्या घटनांत वाढ
रोहिणी खडसे यांनी यापूर्वीही सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको केला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डंका राज्यात वाजविला जात असताना दुसरीकडे राज्यात लाडक्या बहिणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.