ऐझवाल : वृत्तसंस्था
मिझोरम सरकारने कामात टाळाटाळ आणि कामचुकारपणा करणा-या कर्मचा-यांना सेवेतून कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी नीट काम न करणा-या कर्मचा-यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारी विभागांच्या चौकशीसाठी अनेक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या सरकारी विभागांतर्गत कर्मचा-यांच्या कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सरकारला सादर करतील.
सरकारी कर्मचा-यांची वाढती बेपर्वाई लक्षात घेऊन मिझोरम सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. जो कर्मचारी आपले काम नीट करत नाही, त्याला सेवेतून मुक्त केले जाईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच, किती कर्मचारी आपली जबाबदारी चोख बजावत आहेत? याचा शोध घेण्यासाठी शासन सर्व विभागातील कर्मचा-यांच्या कामाचा आढावा घेणार आहे. त्याचबरोबर सरकारने आढावा घेण्यासाठी समित्या तयार करण्यास सुरुवात केली आहे.
ऐझवालमध्ये झालेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले की, योग्य आणि कुशल आणि निष्क्रिय कर्मचा-यांची ओळख पटवण्यासाठी हा पुढाकार घेतला जात आहे.