मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महिलांवरील वाढते अत्याचार, शिवशाही बसमध्ये तरुणीवरील बलात्कार, ढासळती कायदा व सुव्यवस्था, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, मंत्र्यांची बेजबादार वक्तव्ये, कर्जमाफी, हमीभाव, एसटी महामंडळातील भ्रष्टाचार, धारावीची जमीन अदानीच्या घशात घालण्याचा प्रकार, ५० लाख लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्याचा प्रयत्न, शक्ती कायद्याची अंमलबजावणी अशा विविध मुद्यांवर महायुती सरकार अतिशय असंवेदनशील आहे. विरोधी पक्षाला सहकार्य मिळत नसल्याने महाविकास आघाडीने सत्ताधारी पक्षाच्या चहापानावर आज बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भास्कर जाधव, काँग्रेस विधिमंडळ उपनेते अमिन पटेल, आमदार भाई जगताप, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्ष नेते जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.
महायुती सरकारच्या कार्यकाळात झालेले घोटाळे, महिला अत्याचाराच्या घटना, राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, राज्यातील जनतेची सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रखर टीका केली. सत्ताधा-यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला. हे सरकार शेतकरी विरोधी असून तीन बाजूला तीन तोंड असणारे हे विसंवादी सरकार आहे. जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती दानवे यांनी दिली.
कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली
केलेल्या तरतुदी, दिलेला निधी व झालेला खर्च यांची सांगड घातल्यास हा पोकळ अर्थसंकल्प असणार आहे. गेल्यावेळी ज्याप्रमाणे आकडेवारी फिरवून सांगण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न यंदाही होईल. या सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असून प्रथा व परंपरा यात विसंवाद असल्याची टीका कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली.
सत्ताधारी, विरोधकांतील
संस्कृती लोप पावतेय
सत्ताधारी व विरोधक यांच्यातील परंपरा, संस्कृती लोप पावत चाललेली आहे, जोपर्यंत हा संवाद होत नाही, तोपर्यंत चहापाण्यावर बहिष्कार राहील, अशी आमची भूमिका असेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.