मुंबई : प्रतिनिधी
लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. लाडकी बहीण योजना बंद करणार, असे विरोधक म्हणत असले तरीही ही योजना कधीही बंद होणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
दरम्यान, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना महिला आघाडीने आयोजित केलेल्या शिवदुर्गा सन्मान सोहळ्यात त्यांनी बोलताना ही माहिती दिली. त्यामुळे लाडक्या बहिणींना उशिरा का असेना पण २१०० रुपये मिळणार, हे मात्र निश्चित झाले आहे. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महिला व बालविकास मंत्री यांनी २१०० रुपये देणार असे म्हटलेच नाही, असे विधान केले. ज्याने लाडक्या बहिणींच्या गोटात खळबळ उडाली आहे.
महिला दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार असे विचारणा-यांनी निवडणुकीत ३००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण मतदारांनी त्यांना घरी बसवले, अशी टीका शिंदे यांनी विरोधकांवर केली. खुर्चीच्या मोहापायी कोणतीही तडजोड करणार नाही. लाडकी बहीण योजनेत जी काही वाढ करायची आहे त्याचे नियोजन आमच्या डोक्यात आहे, योग्य वेळी योग्य होईल, असे शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आश्वस्त केले.
अडीच वर्षापूर्वी धनुष्यबाण गहाण ठेवायचे, शिवसेना दावणीला बांधण्याचे काम केले म्हणून उठाव केला, असेही यावेळी एकनाथ शिंदेंकडून सांगण्यात आले. तर, शिवसेने ८० जागा लढवल्या आणि त्यातील ६० जागा जिंकून आल्या. यावरुन खरी शिवसेना कोणाची हे निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिले. काहींना मग निवडणूक आयोगाने घोटाळा केला, इव्हीएमने घोटाळा केला अशी आवई उठवली, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला. गेल्या ५० वर्षात नागरी समस्यांची जाण असणारा कोण तर एकनाथ शिंदे असे शरद पवार साहेब म्हणाले आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकात कोणाबद्दल काय लिहून ठेवले हे सुद्धा माहित आहे.