‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू-ए कातिल में है’ अशी गर्जना करत काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचवून पुन्हा सत्ता आणण्याचा निर्धार नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मतदारांच्या नावाच्या चिठ्ठ्या वाटणारा कार्यकर्ता, जिल्हा परिषद सदस्यापासून ते आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे. काँग्रेसला राज्यात गतवैभव मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असेल. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा विजय मिळवून राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. पण विधानसभा निवडणुकीत यश आले नाही. विरोधकांनी मतांची चोरी करून सरकार बनवले. विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे खचून जायचे नाही.
आता रडायचे नाही तर लढायचे आहे असा स्पष्ट संदेश नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सामान्य कार्यकर्त्यांना दिला. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित पदग्रहण सोहळ्यात त्यांनी आपल्या ध्येयधोरणांबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना माहिती दिली. समाज माध्यमाच्या वापराबरोबरच आता रस्त्यावर उतरून लढावे लागेल. टाकीवर चढून ‘शोले’ पद्धतीच्या आंदोलनाला यापुढे थारा दिला जाणार नाही असेही त्यांनी बजावले. भाजप सक्षम नसल्यानेच त्यांना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडावा लागला, काँग्रेसमधील नेत्यांनाही भाजपमध्ये प्रवेश दिला अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेसमध्ये सक्षम नेतृत्व आहे, मात्र गतकाळात काही कड्या सुटल्या आहेत. त्यासाठी संघटन बांधण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांची कडी जोडायची आहे,
कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचणार आहे. पुढील निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, असा निर्धार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने जबरदस्त धक्का दिला. या पराभवानंतर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवून बुलडाण्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे बळकटीकरण होईल आणि महाराष्ट्रात काँगे्रस पुन्हा एकदा भरारी घेईल असा विश्वास काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला पण विधानसभेत मात्र काँग्रेसला अपयश आले. आता पुन्हा जोमाने काम करावे लागणार आहे.
संख्याबळ महत्त्वाचे नाही तर लढण्याची इच्छाशक्ती असावी लागते. काँगे्रस पक्ष कधीच संपणार नाही असा आशावाद विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पुन्हा सर्वांत मोठा पक्ष होईल असे म्हटले आहे. चार वर्षांच्या आपल्या कार्यकाळात संघटनेला बळ देण्याचे काम केले. पोटनिवडणुकांसह अनेक निवडणुका जिंकल्या. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली आता आपल्याला पुढची लढाई लढायची आहे. अफवांना बळी पडू नका, लोकांची कामे करा, महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उभा राहील असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ब-याच चर्चेनंतर काँग्रेसने अखेर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला नवीन अध्यक्ष दिला. बुलडाणा जिल्ह्यातील माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची या पदावर नियुक्ती झाली. या नियुक्तीनंतर काँग्रेसच्या गोटात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या नियुक्तीवर आश्चर्य व्यक्त केले. पण काँग्रेसने पहिल्यांदाच एक नवीन प्रयोग करताना पहिल्यापासून निष्ठा असलेला आणि गावपातळीपासून काम करीत वरच्या पातळीवर पोहोचलेला नेता या पदावर नेमला. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष हा प्रस्थापित घराण्यापैकीच असला पाहिजे अथवा तो साखरसम्राट, सहकार सम्राटच असला पाहिजे असा जो पूर्वापार चालत आलेला संकेत होता त्याला काँग्रेसश्रेष्ठींनी फाटा देऊन एका नव्या चेह-याला संधी दिली. या नियुक्तीचे काँग्रेस संघटनेतून जोरदार स्वागत व्हायला हवे होते. परंतु दुर्दैवाने तसे दिसले नाही. काँग्रेसच्या सद्यस्थितीला काँग्रेसची मूलभूत धोरणेच कारणीभूत आहेत असा आरोप नेहमीच केला जातो. काँग्रेस हा घराणेशाही जोपासणारा, स्थितीवादी आणि नेमस्त राजकारण करणारा पक्ष आहे, या पक्षाला चाकोरीबाहेरचे निर्णय लगेच मान्य होत नाहीत अशी कारणे काँग्रेसच्या सद्यस्थितीबाबत दिली जातात.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसश्रेष्ठींनी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करून एक वेगळी वाट चोखाळल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. काँग्रेसचा सर्वपरिचित असलेला आक्रमक नेता हवा होता असे काही जणांचे म्हणणे होते. त्या तुलनेत सपकाळ हे अगदीच नवखे आहेत असे काहींचे म्हणणे होते पण सपकाळ हे तरुण वयापासून काँग्रेस संघटनेशी जोडले गेलेले आहेत. ते राज्यस्तरीय कबड्डीपटू आहेत. एनएसआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसचे कार्य करण्यास सुरुवात केली. बुलडाणा जिल्ह्यात तरुण वयात ते सरपंच झाले. वयाच्या २७ व्या वर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष बनले. २०१४ ला ते आमदार म्हणून निवडून आले. एआयसीचे ते सेक्रेटरी होते. त्यांनी काँग्रेसच्या वतीने गुजरात आणि मध्य प्रदेशात संघटनात्मक काम केले आहे.
राष्ट्रीय स्तरावर राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांची ही सारी कारकीर्द पाहता ते नवखे आहेत असे कसे म्हणता येईल? ग्रामीण भागात आणि आदिवासींमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या सर्वोदय चळवळीचे पहिल्यापासून काम करणारे ते कार्यकर्ते आहेत. चाकोरीबाहेरचा एक नवीन अध्यक्ष दिल्याने काँग्रेस संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अमित देशमुख यांच्या नावांचीही चर्चा होती. आजच्या अवघड परिस्थितीत काँग्रेसश्रेष्ठींनी चाकोरीबाहेरचा विचार करून तळागाळातून वर आलेल्या एका आश्वासक चेह-याला संधी दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ या संधीचे सोने करतील या अपेक्षेसह त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा!