लातूर : प्रतिनिधी
बिअर बारचे बील मागितल्याचा राग अनावर झाल्याने हॉटेल मालकाला रस्त्यावर ओढत आणुन चाकु, कत्ती, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन दहशत पसरविणा-या अजिंक्य मुळेसह पाच जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहरातील अंबाजोगाई रोडवरील राजश्री बार व त्यासमोरील रोडवर दि. ११ मार्च २०२५ रोजी दुपारी ४ वाजताचे सुमारास अजिंक्य निळकंठ मुळे, बालाजी राजेंद्र जगताप, अक्षय माधवराव कांबळे, प्रणव प्रकाश संदीकर, साहिल रशीद पठाण, नितीन शिवदास भालके व विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी फिर्यादी अजय बाबासाहेब चिंचोले यास राजश्री बारमध्ये दारु पिल्यानंतरचे बिल दे म्हणून पैशाची मागणी केली असता आरोपिंनी हॉटेल मालकाला मारहाण केली होती. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्हयातील आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालकाचे वडील यांचे ताब्यातुन गुन्ह्यात वापरलेले हत्यार चाकु, लोखंडी कत्ती, लोखंडी रॉड व रोख रक्कम २१०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपी अजिक्य निळकंठ मुळे, बालाजी राजेंद्र जगताप, अक्षय माधवराव कांबळे, प्रणय प्रकाश संदीकर, साहिल रशीद पठाण यांना अटक करुन व विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेवुन त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभुमीबाबत अधिक माहीती काढली असता त्यांचेविरुध्द लातूर शहरात हिंसाचाराचा वापर करून, त्यांचे आर्थिक लाभाकरीता प्राणघातक हत्यारांनी सज्ज होवुन जबर दुखापत करून दरोडा टाकणे, दरोडा घालण्याची पूर्व तयारी करणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन घातक हत्याराने जबर दुखापत करणे इत्यादी गंभीर स्वरुपाचे २५ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे नमुद आरोपीताविरुध्द विशेष पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परीक्षेत्र नांदेड यांच्या परवानगीने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कलमवाढ करण्यात आलेली होती.
मोक्का कायद्याचे कलमवाढ केल्यानंतर आरोपी क्र. १ व आरोपी क्र. ३ ते ६ यांचेविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१), (आय आय), ३(२), ३(४) अन्वये गुन्हयाचे २४०३ पानाचे दोषारोप पत्र मा. विशेष मोक्का न्यायालय लातूर येथे दाखल करण्याची मंजुरी अपर पोलीस महासंचालक (कावसु) महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडून घेण्यात आलेली आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, समीरसिंह साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी केला आहे, प्राथमिक तपास पोउपनि हनुमंत कवले यांनी केला आहे. गुन्ह्याच्या तपास कामात मदत पोलिस अंमलदार वाजीद चिकले, धैर्यशील मुळे, पांडुरंग सगरे, मोहन सुरवसे यांनी केलेली आहे.