बार्शी : बार्शी शहरातील सराफ व्यावसायिक संजय महादान्य यांना त्यांच्या दुकानातील कामगारानेच तब्बल ४२५ ग्रॅम सोने आणि रोख रक्कम मिळून ३८ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याबाबत संजय महादान्य यांनी पोलिसांत फिर्याद देताच सुवर्णकार कामगार शुभम शरद वेदपाठक (रा. मंगळवार पेठ, बार्शी) याच्या विरोधात चोरीचा, विश्वासघात व फसवणुकीचा बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संजय महादान्य हे गेल्या ३० वर्षांपासून बार्शी शहरात ‘मोहित अलंकार’ या नावाने सराफ व्यवसाय करतात. त्यांच्या दुकानात आरोपी हा गेली ७-८ वर्षांपासून सुवर्णकार म्हणून काम करीत होता.
विश्वासाने संजय महादान्य आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडे ग्राहकांचे सोने दागिने बनवण्यासाठी दिले होते. १२ मार्च रोजी संजय महादान्य यांनी आरोपीला मागील काही महिन्यांत दिलेल्या सोन्याच्या हिशेबाची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्याने त्यांनी दुकानातील ड्रॉव्हर तपासला; परंतु तिथे दागिने किंवा सोने सापडले नाही. यावेळी संजय महादान्य आणि त्यांच्या पत्नीने आरोपीला विश्वासात घेत विचारले असता त्याने संपूर्ण सोने मोडून पैसे जुगारात उडवले असल्याची कबुली दिली.
सोन्याची संपूर्ण यादी तपासणी त्याच्या समक्ष करताना दुकानातून गायब झालेल्या सोन्याची किंमत ३८ लाख ४० हजार ३५१ रुपये असल्याचे समोर आले. या चोरीची कबूल करत ‘मी काही दिवसांत सोने परत करतो’ असे सांगून वेळ मागितली. मात्र, संजय महादान्य यांनी वेळ देण्यास नकार दिल्याने त्याला पोलिसांत तक्रार करू नका, नाहीतर पाहून घेईन, अशी धमकी दिली. तसेच आरोपीच्या कुटुंबीयांनी संजय महादान्य यांच्याकडे सोने परत करण्यासाठी काही वेळ मागितला; पण ग्राहकांच्या दागिन्यांची जबाबदारी असल्याने त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत