मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. देशमुख यांच्या मारेक-यांना तात्काळ अटक करावी तसेच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मूक मोर्चात जनतेचा आक्रोश पहायला मिळाला. शनिवारी सकाळी ११ वाजता निघालेला हा सर्वपक्षीय मोर्चा बीडच्या डॉ. आंबेडकर चौकातून माळीवेस, अण्णा भाऊ साठे चौक, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचला. या मोर्चात राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, आ. संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीचे (अजित पवार), आ. प्रकाश सोळंके, भाजप आ. सुरेश धस, अभिमन्यू पवार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील, माजी आ. बच्चू कडू अशी सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि प्रचंड संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चात मृत संतोष देशमुख यांची दोन्ही मुले, पत्नी तसेच बंधू धनंजय देशमुख यांचाही सहभाग होता. परभणीत आंबेडकरी विचाराच्या सुशिक्षित तरुणाचा पोलिस मारहाणीत झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्याच आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. या दोन्ही घटनांवर जनतेने व सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी वस्तुस्थिती मांडली आहे. पण महायुती सरकार हे मान्य करत नाही.
हे सरकार प्रायोजित असल्याने सीआयडी चौकशी केली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. तर शिवसेना(ठाकरे) नेते संजय राऊत यांनी याला शहरी नक्षलवादाचे नाव दिले असून हा नक्षलवाद भाजपच्या लोकांकडेच आहे. या नक्षलवादाचे कमांडर मुख्यमंत्री फडणवीस हेच असल्याची टीका त्यांनी केली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुरुवारी राज्य गुन्हे अन्वेषणचे अप्पर पोलिस महासंचालक प्रशांत बोरुडे यांनी केज येथे जाऊन आढावा घेतला होता. देशमुख हत्याप्रकरणी राज्य सरकारने सीआयडीतील उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती केली आहे. बीडमध्ये हजारोंच्या संख्येने निघालेल्या मोर्चात सर्वच नेत्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर हल्ला चढवत त्यांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी केली. यावेळी बोलताना भाजप आमदार सुरेश धस म्हणाले, बीडमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ‘गोली मार भेजे में’ नाहीतर ‘गोली मार किधरभी’ असे सुरू आहे.
आतापर्यंत इथे अनेक हत्या झाल्या. या लोकांनी अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले, जमिनी लाटल्या.. अशा लोकांना बिनभाड्याच्या खोलीतच पाठवायला हवे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. अनेकांकडे बंदुकीचे परवाने आहेत. हे परवाने ज्यांनी दिले त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. आम्ही पाच वेळा आमदार झालो पण आम्हालाही या ठिकाणी सुरक्षा मागावी लागते असेही आमदार धस म्हणाले. संतोष देशमुख यांची हत्या होऊन तीन आठवडे उलटले तरीसुद्धा काही आरोपी अद्याप मोकाट आहेत. या प्रकरणाचा वाल्मिक कराड ‘आका’ असल्याचे बोलले जाते. त्यांच्यावर संशयाची सुई आहे परंतु त्यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. परळी तालुक्यात गोदावरी नदीतून रोज वाळूचा उपसा होतो. वाल्मिक कराड यांच्या मागे ज्यांनी शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असेपर्यंत या प्रकरणात न्यायाची अपेक्षा नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी असल्याचे सांगितले जाते. संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवारांना सरळ सरळ आव्हान देताना म्हटले आहे की, तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. तुमची काम करण्याची पद्धत परखडपणाची असेल तर तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा. तुम्हाला बीडचा बिहार करायचा आहे का? असा सवालही त्यांनी केला. देशमुख यांच्या हत्येवरून वादाच्या भोव-यात सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी गुुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती. देशमुख यांची हत्या करणारे गुन्हेगार आणि त्यामागचे सूत्रधार यांना फाशीची शिक्षाच देण्यात यावी अशी आपली पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे असे सांगून या घटनेवरून आपल्याला राजकीय व सामाजिक जीवनातून उठविण्याचा काहींचा डाव असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला होता.
माजलगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जमा केलेला ४० लाख रुपयांचा निधी देशमुख कुटुंबाला देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. या आरोपींना अटक होत नसल्याने बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. तसेच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत, ते खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याचा आदेश दिला आहे. मोर्चातील आंदोलकांनी निषेध म्हणून काळ्या फिती बांधून, काळे झेंडे व निषेधाचे पोस्टर हातात घेतले होते. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने कळकळीचे आवाहन करताना म्हटले की, माझ्या वडिलांची हाल हाल करून हत्या करण्यात आली. ते शेवटपर्यंत समाजासाठी झुंजत होते.
त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही सर्व माझ्या कुटुंबासोबत राहा. हा लढा आपण सर्व एकत्र राहून लढू. बीड जिल्ह्यातील सर्व घटनांमागे ‘आका’ चा हात असल्याचे बोलले जाते. हा ‘आका’ मात्र हाती लागत नाही. त्याला जेरबंद केल्याशिवाय बीड जिल्ह्यातील दहशतीला आळा बसणार नाही. काही वर्षांपूर्वी ‘गँग ऑफ वासेपूर’ नावाचा हिंदी सिनेमा आला होता. पोह्यासाठी प्रसिद्ध असलेले मस्साजोग ‘गँग ऑफ मस्साजोग’ होऊ नये याची काळजी घ्यायला हवी.