मुंबई : प्रतिनिधी
नागरिकांना आता कोणत्याही प्रतिज्ञापत्रासाठी ५०० रुपये स्टॅम्प शुल्क देण्याची गरज नाही. कारण आता राज्य सरकारने सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ५०० रुपयांचे स्टॅम्प शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत हा निर्णय जाहीर केला आहे. पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरऐवजी सध्या कागदावर अर्ज करून विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जातपडताळणी प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासारख्या शासकीय कार्यालयात दाखल कराव्या लागणा-या सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क शासनाने माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागत होते.
मात्र आता केवळ अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्रे मिळू शकणार आहेत. महसूलवाढीसाठी अशा दाखल्यांसाठीचे मुद्रांक शुल्क १०० रुपयांवरून ५०० रुपये करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला होता. या निर्णयाचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसणार असल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधासभेत हा निर्णय मागे घेतला आहे.
आता या निर्णयाची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवेदनाद्वारे सभागृहात दिल्याने या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच होणार आहे. दरम्यान या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. या निर्णयाचा सर्वांत जास्त फायदा विद्यार्थी व त्यांच्या पालकांना होणार आहे.