लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेने शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर रोजी शहरातील राजीव गांधी चौक ते महात्मा बसवेश्वर चौक या रिंग रोडच्या सर्व्हीस रोडवर उभा असलेल्या ९१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून ५६ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. तसेच याच रिंग रोडवरील अतिक्रमणे काढून बांधकाम साहित्यही जप्त केले.
शहराजवळून जाणा-या रिंगरोड लगत सर्व्हिस रोडवर वाहने पार्किंग करु नयेत असे निर्देश असतानाही शहराच्या राजीव गांधी चौक ते गरुड चौक, गरुड चौक ते सिद्धेश्वर चौक, सिद्धेश्वर चौक ते पु. अहिल्यादेवी होळकर चौक, पु. होळकर चौक ते रेल्वे स्टेशन रोडपासून ते एमआयडीसीपर्यंत आणि पीव्हीआर चौक रिंग रोड ते औसा रोड छत्रपती चौकापर्यंत रिंग रोडच्या दुतर्फा सर्व्हीस रोडवर चारचाकी वाहनांची पार्कींग मोठ्या प्रमाणात होत आहे. रिंगरोडच्या सर्व्हीस रोडचा वापर हा केवळ ट्रक व तत्सम वाहनांच्या पार्कींगसाठीच होतो आहे. रिंगरोडवरुन वाहने वेगात जातात. अशा स्थितीत त्या परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांच्या सोयीसाठी सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे. परंतु गेल्या कांही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जात आहेत.
या संदर्भात मनपाने काही दिवसांपूर्वीच निर्देश देऊन सर्व्हिस रोडवर वाहने पार्क केल्यास दंड करण्याचा इशारा दिला होता. मात्र सर्व्हीस रोडवर पार्किंग मोठ्या प्रमाणात होत आहे. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेने शुक्रवारी रिंग रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. राजीव गांधी चौक ते महात्मा बसवेश्वर चौक या दरम्यानच्या रिंग रोडवरील सर्व्हीस रोड शुक्रवारी महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक व शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली. सर्व्हीस रोडवरील ९१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत ५६ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला तर १० ते १५ अतिक्रमणे काढून साहित्य जप्त करण्यात आले. पत्राचे शेड काढण्यात आले. सर्व्हीस रोडवर ठेवण्यात आलेले बांधकाम साहित्यही जप्त करण्यात आले. या मोहिमेमध्ये वाहतूक पोलीस निरीक्षक गणेश कदम, लातूर शहर महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुख रवी कांबळे, सहाय्यक पांडुरंग सूळ, अजय घोडके, मुस्तफा शेख, आतिश गायकवाड, रज्जाक शेख, महेंद्र घोडके, सुनील कांबळे यांचा समावेश होता.