लातूर : योगीराज पिसाळ
शिक्षकांच्या कार्याचे मुल्यांकण करून प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची निवड करून त्यांना दि. ५ सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. मात्र गेल्या दोन वर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी, शिक्षकांचा मान, सन्मान वाढवणयासाठी शिक्षण विभागाला मुर्हूत सापडला नाही. विशेष म्हणजे यावर्षीतर शिक्षक दिन आला तरी विभागीय आयुक्तांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराची यादीच मंजूर केली नसल्याचे समोर आले आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडूनन प्रत्येक तालुक्यातून १० अशा प्रमाणे २० शिक्षक व एक दिव्यांग अशा २१ शिक्षकांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते. सदर प्रक्रीया ही निवड समितीच्यावतीने करण्यात येते. शिक्षण विभागाने २०२२-२३, २०२३-२४ या वर्षांचे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारथी निवडले आहेत. तर २०२४-२५ या वर्षाच्या शिक्षकांची जिल्हा निवड समितीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारर्थीची निवड करून यादी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालयाकडे मंजूरीसाठी गेल्या सहा दिवसापूर्वी लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पाठवली आहे. मात्र विभागीय आयुक्त यांनी सदर पुरस्काराची यादी अद्याप मंजूर न केल्याने यावर्षीतर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराची यादीही जाहिर होऊ शकली नाही. ही आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणा-या शिक्षकांची शोकांतीका आहे.
विशेष म्हणजे २०२२-२३, २०२३-२४ या वर्षांचे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारथी निवडले गेले आहेत. मात्र पालकमंत्र्यांना वेळ न मिळाल्याने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रखडला आहे. विधान सभा निवडणूक महिण्यावर आली आहे. त्यामुळे यावर्षी तरी निवडणूकीच्या पूर्वी आपला पुरस्कार मिळेल अशी आपेक्षा शिक्षक बाळगून आहेत.