सोलापूर : मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त अनोखा विक्रम राज्यात करण्यात येणार आहे. सोलापुरात शिवजयंतीनिमित्त दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ तारखेला झाला. त्यामुळे सलग १९ तास, १९ मिनिटे, १९ सेकंद दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प सोलापुरात करण्यात आला. ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्टस् असोसिएशन, भारतीय लाठी महासंघाकडून हा विश्वविक्रम करून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात येणार आहे.
सोलापुरात १९ तास, १९ मिनिटे, १९ सेकंद दांडपट्टा चालवून विश्वविक्रम करून शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे. दांडपट्टा चालवणा-या सात मावळ्यांकडून हा दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. सोलापुरातील चार पुतळा परिसरात पहाटे पाच वाजल्यापासून दांडपट्टा चालवण्यास सुरुवात होणार आहे. रात्री साडेबारा वाजेपर्यंत सात मावळ्यांकडून दांडपट्टा चालवत विश्वविक्रम पूर्ण करण्यात येणार आहे.
दांडपट्टा चालवणा-या मावळ्यांमध्ये मुस्लिम खेळाडू
दांडपट्टा चालवणा-या सात मावळ्यांमध्ये मुस्लिम खेळाडूंचा सहभाग आहे. ते सुद्धा सलग १९ तास दांडपट्टा चालवणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शौर्याचे प्रतीक म्हणून दांडपट्टा या शस्त्राला मोठी ओळख होती.