मुंबई : प्रतिनिधी
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण २६ वर्षांचा असून त्याला पोलिसांनी वडोदरामधून ताब्यात घेतले आहे. सलमान खानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकीही त्याने दिली होती. ट्रॅफिक पोलिस विभागाला व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज मिळाला होता, ज्यामध्ये त्याची कार बॉम्बने उडवून देण्याची आणि घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती.
शिवाय, वरळी पोलिस ठाण्यातही एक कॉल आला होता. त्या फोन कॉलच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या धमकी केसमध्ये २६ वर्षीय एका तरुणाला गुजरातच्या वडोदरामधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनुसार, त्या तरुणाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे म्हटले जात आहे. लवकरच मुंबई पोलिस त्याची चौकशी करणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या पोलिस तपास करत आहेत.
सलमान खानला ही धमकी त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराबाहेर गोळीबाराच्या घटनेनंतर एक वर्षाने देण्यात आली होती. १४ एप्रिल २०२४ रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर ४ राऊंड फायरिंग झाले होते. लॉरेन्स गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.