मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. ‘भाईजान’ला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सऍप नंबरवर एका अज्ञात व्यक्तीने धमकी पाठवली आहे. आता पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सलमान खानला सतत जीवे मारण्याची धमक्या मिळत असल्याने मुंबई पोलीस खूप सर्तक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती थोडी शांत होती. मात्र वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सऍप नंबरवर सलमानला त्याच्या घरात घुसून मारेल, अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय त्याची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली गेली आहे.
सध्या धमकी देणा-या व्यक्तीविरुद्ध वरळी पोलीस चौकशी करत आहे. लॉरेन्स बिश्नोई ब-याच काळापासून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देत आहे. याआधी देखील सलमानच्या घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरही गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात सलमानच्या घराच्या भिंतीलाही एक गोळी लागली होती.
तसेच भाईजानच्या घरावर एक गोळी लागली आणि जाळी फाडून गेली. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून तिथून पळून गेले. तपासादरम्यान, गोळीबाराची जबाबदारी घेणारी एक फेसबुक पोस्ट यानंतर समोर आली होती. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही पोस्ट तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोईनं केली होती.