सोलापूर-शासनाच्या प्रत्येक योजना ग्रामीण भागातील प्रत्येक घराघरांत पोहोचविण्याबरोबरच बालकांच्या कुपोषण निर्मूलनाचे महत्वाचे काम करून सशक्त भारत घडविण्यासाठी अंगणवाडीताईंचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे काम हे समाजासाठी प्रेरणादायी असेच आहे, असे गौरवोद्गार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी काढले.
जामगोंडी मंगल कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्ह्यातील १६ बालविकास प्रकल्पातील प्रति प्रकल्प ३ याप्रमाणे एकूण ४८ अंगणवाडी सेविका, ४८ अंगणवाडी मदतनीस व प्रति प्रकल्प १ याप्रमाणे १६अंगणवाडी पर्यवेक्षिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्या हस्ते आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्यासह जिल्हयातील बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच जिल्हयातील विविध प्रकल्पातील अंगणवाडी सेविकां यांनी गीतगायन, एकपात्री तसेच सामूहिक नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी मिरकले यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीस यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले व यापुढेही कुपोषण निर्मूलनात भरीव योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक प्रशासन अधिकारी प्रताप रुपनर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिवानंद मगे, विस्तार अधिकारी श्रीकांत मेहरकर, वरिष्ठ सहायक रेणुका प्रथमशेट्टी, परमेश्वर पांचाळ, कनिष्ठ सहायक साहेबराव देशमुख, परिचर अनिता वसेकर यांनी परिश्रम घेतले.
अंगणवाडी सेविकांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात लाखभर वेतन घेणाऱ्या २५ अंगणवाडी पर्यवेक्षिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या आश्वासित योजनेचा लाभ देऊन महिला दिनाची भेट दिली. दुसरीकडे तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या व गेल्या पाच महिन्यांपासून प्रोत्साहन अनुदानाचा प्रतीक्षेत असलेल्या सेविका व मदतनिसांना मात्र शासन स्तरावरुनच झुलवत ठेवले आहे. तसेच लाडक्या बहिणींचे अर्ज भरलेल्या सेविका अजूनही मोबदल्यापासून वंचितच आहेत. याकडे मात्र शासन व प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. एकूणच आजच्या कार्यक्रमावरुन पर्यवेक्षिका लाडक्या तर सेविका व मदतनिस सावत्र बहिणी असल्याचे दिसून येते. याविषयी अंगणवाडी सेविका व मदतनिसांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.