पुणे : प्रतिनिधी
नुकताच तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील तिसरा अहवाल राज्य शासनाला प्राप्त झाला आहे. याअगोदर राज्य शासनाला तनिषा यांच्या मृत्यू प्रकरणातील सार्वजनिक आरोग्य विभाग आणि धर्मादाय सह आयुक्त समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे.
अखेर तिसरा अहवाल पुणे महापालिकेच्या माता मृत्यू समितीने राज्य शासनाला सुपुर्द केला आहे. या अहवालात मातेच्या मृत्यूचे नेमके कारण कोणते याचे विश्लेषण करण्यात आले आहे. आता या प्रकरणात दीनानाथ रुग्णालयाची तपासणी ससून रुग्णालयातील चौकशी समिती करणार असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय इतर दोन्ही रुग्णालयांतील देण्यात आलेल्या उपचारांची चौकशी देखील या समितीमार्फत करण्यात येणार आहे.
गर्भवती महिलेच्या मृत्यूचा तपास आता ससून रुग्णालय करणार आहे. या प्रकरणी डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाला का याची चौकशी ससून रुग्णालयाची चौकशी समिती करणार आहे. तसेच गर्भवती महिलेला ज्या तीन रुग्णालयांत उपचार देण्यात आले होते, या तिन्ही रुग्णालयांच्या उपचारांची चौकशी या समितीमार्फत करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी यासंबंधीचे पत्र पुणे पोलिसांना दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयातील चौकशी समिती मंगळवारपासून करणार आहे.