पुणे : प्रतिनिधी
देशातील विविध राज्यांत कार्यरत असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था सक्षम करण्याबरोबर नव्याने स्थापन होणा-या देशातील पहिल्या सहकार विद्यापीठाचा अभ्यासक्रम त्या त्या राज्यातील भाषेत देण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
सहकार क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण, संशोधन आणि शैक्षणिक अभ्यासक्रम यावर भर दिला जाणार आहे असे नमूद करून ते म्हणाले, यासाठी त्या त्या राज्यातील संस्थांना संलग्नता दिली जाणार आहे तसेच जगातील सर्वांत उत्तम पद्धतीचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी पाच वर्षांत सुमारे १७ लाख युवकांची सहकार क्षेत्राच्या वाटचालीसाठी आवश्यकता आहे.
यासाठीच सहकार विद्यापीठ कार्यरत असणार आहे. विद्यापीठातून प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पूर्ण होऊ शकते. त्या त्या राज्यातील विविध सहकारी सोसायटी सक्षम करणे यासाठी २५ विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. आता ४२ हजार सोसायट्या सुरू असून ६८ हजार सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे.
या सोसायट्यांना आयकर नाही पण रिटर्नस् भरणे आवश्यक आहे वैकुंठभाई मेहता ही संस्था नव्याने स्थापन होणा-या त्रिभुवन सहकार विद्यापीठाचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ते म्हणाले, साडेतीन वर्षांपूर्वी सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले यामुळे सहकार क्षेत्राच्या विस्ताराला गती आली आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्रिभुवन विद्यापीठाबाबतचे विधेयक संमत झाले आहे. नजीकच्या काळात विद्यापीठ सुरू होईल. त्यासाठीची मूलभूत सुविधा उपलब्ध आहे.
एनसीडीसीच्या माध्यमातून देशातील सहकार क्षेत्राला १ लाख २८ हजार कोटी निधी देण्यात येणार आहे असे नमूद करून ते म्हणाले, त्याचप्रमाणे सहकारी साखर कारखान्यांनासुद्धा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.