22.4 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeमहाराष्ट्रसांगली-राजापूर बसचा अपघात

सांगली-राजापूर बसचा अपघात

राजापूर : प्रतिनिधी
सांगलीहून राजापूरच्या दिशेने येणा-या बसला अणस्कुरा घाटात सोमवारी सकाळी १०.३० वाजता ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला. मात्र यावेळी चालक एस. आर कुर्णे यांनी प्रसंगावधान राखत गाडी डोंगराच्या दिशेने घातल्याने मोठा अपघात टळला. त्यांच्या खबरदारीमुळे ५० प्रवाशांचा जीव वाचला. अन्यथा गाडी दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती.

कुर्णे हे आपल्या ताब्यातील बस क्र. एम. एच. १४, बी. टी. २९७५ ही राजापूर-सांगली बस घेऊन सांगली येथून सकाळी ६.३० वाजता रवाना झाले होते. ही बस सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान अणस्कुरा घाट उतरत असताना अचानक गाडीचे ब्रेक निकामी झाले. चालक कुर्णे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी अत्यंत सावधगिरीने बस डोंगराच्या दिशेने वळवत थांबवली. त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला.

या बसमध्ये जवळपास ५० प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. दरम्यान या गाडीने राजापूर पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे व तलाठी सतीश शिंदे हे देखील प्रवास करीत होते. त्यांनीही मोठ्या अपघातातून वाचल्याची प्रतिक्रिया दिली. चालक कुर्णे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

राज्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे, त्यामुळे महामार्गावरील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. कोकणात जाणारे आणि इतरही राज्य महामार्गावर रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे अपघातांचे सत्र वाढत आहे. याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गावर देखील अपघातांचे सत्र सुरूच आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR