21 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeसोलापूरसांगोल्यात खेळाडूंसाठी सुविधांची वानवा

सांगोल्यात खेळाडूंसाठी सुविधांची वानवा

सांगोला : शहरातील खेळाडूंना थोड्याफार प्रमाणात खेळांच्या सुविधा मिळत असल्या तरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील खेळाचे मैदान अन् साहित्यांचा वानवाच असल्याचे दिसून येत आहे. खेळाडूंकडून अपेक्षा तर पदकांच्या ठेवायच्या मात्र त्यासाठीच्या सुविधांचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मानवी जीवनात खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध प्रकारच्या खेळांमुळे शरीर तर सुदृढ बनते परंतु त्याचप्रमाणे वेळेचे बंधन, धैर्य, शिस्त, गटामध्ये काम करणे हे शिकवतात. खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास अन् त्यामध्ये सुधारणा करण्यास मोठी मदत होते. सध्या मुले व तरुण पिढीचा मोबाईलच्या अतिवापरामुळे मैदानी खेळांकडील ओढा कमी झाला आहे. परंतु आवडीनुसार विविध खेळात प्रावीण्य मिळवण्यासाठी मुलांना, खेळाडूंना सुविधा मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरात कबड्डी व खो-खोच्या खेळांसाठी थोड्याफार प्रकारे साहित्य असले तरी टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, स्केटिंग, फुटबॉल अशा विविध प्रकारच्या खेळ खेळण्यासाठी मैदाने खेळाडूंना मिळत नाही. हे खेळ खेळण्यासाठी व सरावासाठी विद्यार्थ्यांना शहरात जावे लागत
आहे. ग्रामीण भागात विभागनिहाय मोठ्या खेड्यांमध्ये किंवा जिथे मैदानांची सोय आहे अशा ठिकाणी विविध प्रकारचे मैदाने व खेळ साहित्य सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी पालक, खेळाडूंमधून होत आहे.

सांगोल्यातील दहा एकर जागेत असलेल्या क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा संकुल समितीने ५२ कोटी ९४ लाख ९५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. या संकुलास यापूर्वी १ कोटी ९ लाख ५४ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. क्रीडा संकुल समितीस वाढीव शासन अनुदान मर्यादा विचारात घेऊन यापूर्वी झालेला खर्च एक कोटी व सुधारित ३ कोटी रुपये असे मिळून चार कोटी रुपयांच्या अंदाजपत्रक आराखड्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलिबॉल, खो-खो मैदान, कबड्डी, फुटबॉल मैदान, वॉकिंग ट्रॅक, मुलामुलींचे वसतीगृह (तळमजला) व इतर खर्च याचा समावेश आहे. शहरातील क्रीडा संकुल विविध सुविधांनी सुसज्ज असे बनणार असल्यामुळे शहरातील खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR